For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणखी एका युद्धाची चाहुल

06:22 AM Feb 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
आणखी एका युद्धाची चाहुल
Advertisement

अमेरिका-इराण यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे : दोन्ही देशांकडून तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन, तेहरान

अमेरिका आता कुठल्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकतो. मध्यपूर्वेत अमेरिकेच्या सैन्याची तेनात आणि इराणची तयारी पाहता चालू आठवड्याच्या अखेपर्रंत अमेरिका पूर्ण शक्तिनिशी इराणवर हल्ला करणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याचदरम्यान इराणने शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस आणि सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षाला पत्र लिहून अमेरिकने हल्ला केल्यास अमेरिकेच्या तळांवर आणि संपत्तींवर इराणचे हल्ले ‘वैध’ असतील असा इशारा दिला आहे.

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आण्विक मुद्द्यावर अमेरिकेसोबत करार करण्यासाठी कमाल 10-15 दिवसांचा कालावधी दिला आहे. जर दोन्ही बाजू कुठल्याही करारावर पोहोचण्यास अपयशी ठरले तर वाईट गोष्टी घडतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे प्रतिनिधी अमीर सईद इरवानी यांनी इराण कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.. तसेच त्यांनी क्षेत्रात सैन्य आक्रमकतेच्या गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. यामुळे आता संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तविली जात असून यामुळे पूर्ण क्षेत्र हादरू शकते.

काय आहे शक्यता?

अमेरिका इराणवर केवळ मर्यादित हवाई आणि सागरी हल्ले करण्याची शक्यता आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी निगडित तळ, क्षेपणास्त्र साठे आणि त्याच्या आण्विक कार्यक्रमाशी निगडित ठिकाणे निशाण्यावर राहू शकतात. अशास्थितीत इराणचे नेतृत्व कमकुवत पडू शकते आणि अखेरीस सत्तापरिवर्तनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. परंतु इराक आणि लीबियातील पाश्चिमात्य हस्तक्षेपानंतर तेथे दीर्घकाळापर्यंत अस्थिरता दिसून आली होती. यामुळे हा मार्ग जोखिमयुक्त मानला जात आहे.

धोरणात बदल करणार इराण?

तर अन्य एका शक्यतेनुसार इराणचे नेतृत्व कायम राहू शकते, परंतु सैन्यदबावानंतर स्वत:च्या धोरणांमध्ये बदल करू शकते. यात क्षेत्रीय सशस्त्र समुहांना समर्थन कमी करणे, क्षेपणास आणि आण्विक कार्यक्रम मर्यादित करणे आणि देशांतर्गत कठोर धोरण शिथिल करणे सामील असू शकते. काही विश्लेषकांनी याला ‘व्हेनेझुएला मॉडेल’सारखे ठरविले असून तेथे बाहेरील दबावामुळे सरकार कोसळले नाही, परंतु मर्यादित बदल झाले आहेत. पण इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई हे दशकांपासून बदलांसाठी दबावाला सामोरे जात राहिले असल्याने मोठ्या सुधारणांची शक्यता कमी मानली जातेय.

इराणमध्ये सैन्य नेतृत्व?

अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणमधील शासनव्यवस्था कमकुवत झाल्यास आणि जनतेचे आंदोलन सत्ता सांभाळू न शकल्यास इराणचे सुरक्षा दल पुढे येऊ शकतात. रिव्होल्युशनरी गार्डची राजकारण आणि उद्योगव्यवसायात मजबूत पकड आहे. अशास्थितीत तेथे सैन्यनेतृत्वाचे सरकार उदयास येऊ शकते. आतापर्यंत निदर्शनांमुळे सत्तेच्या स्तरावर मोठी फूट पडलेली नाही आणि सरकारने बळाचा वापर करत नियंत्रण कायम ठेवले आहे.

इराणच्या निशाण्यावर अमेरिकेचे तळ

दुसरीकडे इराणही पूर्ण तयारीत आहे. अमेरिकेच्या कुठल्याही हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. आमची बेटं ट्रिगरवरच आहेत असा इशारा इराणने दिला आहे. आखातातील अमेरिकेचे तळ म्हणजेच कतार आणि बहारीन येथील तळांवर इराण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला करू शकतो. तसेच तो इस्रायल किंवा जॉडंन यासारख्या देशांनाही लक्ष्य करू शकतो. या देशांना अमेरिकेचे समर्थक मानले जाते. यामुळे पूर्ण क्षेत्रात मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने आखाती देश चिंतेत आहेत.

कच्च्या तेलावर येणार संकट

संघर्षुमळे होर्मुझ सामुद्रधुनीतही तणाव वाढू शकतो. इराण सागरी सुरुंग पेरून जहाजांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण करु शकतो. कच्चे तेल आणि वायूची जवळपास 20 टक्के वाहतूक याच सागरी मार्गातून होत असते. कुठल्याही अडथळ्याचा प्रभाव जागतिक ऊर्जा बाजारावर पडणार आहे. परंतु अशाप्रकारचे पाऊल इराणच्या अर्थव्यवस्थेलाही नुकसान पोहोचवू शकते.

Advertisement
Tags :

.