राज्यातील तिसरे ‘संवेदना उद्यान’ साकारतेय कोल्हापुरात
महावीर उद्यानांमध्ये कामाला प्रारंभ
इम्रान गवंडी/ कोल्हापूर
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशस्त जागेतील महावीर उद्यानात ठाणे, नाशिकनंतर राज्यातील तिसरे दिव्यांगांसाठी ‘संवेदना उद्यान’ साकारले जात आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंडने (नॅब) कोल्हापुरात ‘संवेदना उद्यान’ उभारण्यासाठी महापालिकेकडे तीन वर्षापुर्वी मागणी केली होती. अखेर मागील महिन्यात याची वर्कऑर्डर निघाली आहे. निविदा, आराखडा, निधी आदी सर्व प्रक्रीया पुर्ण होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्यानाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.
संवेदना उद्यानामुळे दिव्यांगांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळणार आहे. याचे काम वेळेत पुर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे. दिव्यांगांना उद्यानांमध्ये बागडण्याबरोबरच खुल्या वातावरणात जाऊन निसर्गाचा आनंद घेत स्पर्श, गंध व ध्वनीच्या संवेदनांचा विकास व मनोरंजनातून बुद्ध्यांक व व्यक्तीमत्त्व विकासासाठी संवेदना उद्यानाची संकल्पना पुढे आली. नॅबच्या पुढाकाराने या उद्यानाच्या निर्मितीसाठी दिलेला प्रस्ताव मान्य झाला. व याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली. सहा महिन्यात या उद्यानाचे काम पुर्ण होणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दिव्यांगांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना
महावीर उद्यानाच्या पुर्वेकडील प्रशस्त जागेत संवेदना उद्यान उभारले जात आहे. दिव्यांगांना स्पर्श, गंध, ध्वनीच्या ज्ञानासोबत आत्याधुनिक साधने, विविध खेळणी, सुगंधी फुलझाडे, रचना, पदपथ तयार करण्यात येणार आहे. नाशिकमधील उद्यानाच्या धर्तीवर आराखडा तयार केला आहे.
सुशोभिकरणाच्या कामाला गती देण्याची गरज
येथील सुशोभिकरणाचे काम सुरू असले तरी कामाला गती देण्याची गरज आहे. गेल्या कित्येक वर्षापासुन बालचमुंचे आकर्षण असलेली रेल्वे, कारंज्या बंदच आहेत. येथील स्मारकांच्या सभोवती अनावश्यक गवत वाढले आहे. खेळणी मोडकळली आहेत.
कर्मचारी संख्या अपुरी
कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे उद्यानाची म्हणावी तशी देखभाल होत नाही. कर्मचारी निवारा इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे. इमारतीच्या भिंतीला भेगा पडल्या असुन इमारतीत उद्यानातील मोडकळलेले साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे.
निधी मंजूर कामाला गती हवी
उद्यानातील स्मारकाच्या सुशोभिकरणाससह विविध कामासाठी निधी मंजूर झाला आहे. गटर्स, सुरक्षा भिंतीचे काम पुर्ण झाले असले तरी अजुनही बरीच कामे प्रलंबीत आहेत. आसन व्यसस्था, बालचमुंची खेळणी, विरंगुळा केंद्र, लॉन गार्डन, गार्डन फ्लॉवर बेड आदी कामे रखडली आहेत.
उद्यान बंदमुळे नागरिकांची गैरसोय
उद्यानासमोर जिल्हाधिकारी कार्यालय, उद्योग भवन तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालय आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची रेलचेल असते. निवेदने, मोर्चा, राजकीय सभामुळे नागरिकांना काहीवेळा दिवसभर थांबावे लागते. अशा लोकांना विश्रांतीसाठी या उद्यानाचा आधार मिळतो. मात्र उद्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवले जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सुचना
राज्यातील तिसऱ्या संवेदाना उद्यानाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सहा महिन्यात याचे काम पुर्ण होईल. सुशोभिकरणासह इतर रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सुचना दिल्या आहेत. गरज भासल्यास उद्यान सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल केला जाईल.
समीर व्याघांब्रे, मनपा उद्यान अधिक्षक