हल्ल्यातील दशहतवादी पाकिस्तानीच
लोकसभेत अमित शहा यांची घोषणा, विरोधकांवर सडकून टीका, पिडीतांना न्याय मिळाल्याची भावना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय सेनेने ‘महादेव अभियाना’च्या अंतर्गत पहलगाम येथे निरपराध पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून हे तीन्ही दहशतवादी पाकिस्तानीच आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केली आहे. सोमवारपासून लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ‘सिंदूर अभियान’ या विषयावर महाचर्चा होत आहे. मंगळवारी हीच चर्चा पुढे नेताना अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. सोमवारी श्रीनगरनजीक चकमकीत सैनिकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या अभियानावर ते बोलत होते.
पहलगाम येथे हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातील आहेत, हे कशावरुन, असा वादग्रस्त प्रश्न सोमवारी माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला होता. त्याचा मंगळवारी अमित शहा यांनी लोकसभेत चांगलाच समाचार घेतला. हे दहशतवादी पाकिस्तानीच आहेत, याचे ठोस पुरावे भारताच्या सेनेने संकलित केले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची मतदार कार्डे, त्यांच्याकडे सापडलेली चॉकलेटस् आणि अन्य गुन्हावैज्ञानिक पुरावे यांच्या आधारे हे दहशतवादी पाकिस्तानीच होते, हे निर्विवादपणे सिद्ध होत आहे. तथापि, विरोधक हा प्रश्न उपस्थित करुन पाकिस्तानलाच ‘क्लिन चिट’ देत आहेत, हे निंदाजनक आहे. त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाकडे आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे, असा धारदार प्रतिवार अमित शहा यांनी आपल्या भाषणात केला आहे.
आणखीही अनेक पुरावे
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके 47 रायफल्स आणि एक एम 4 पिस्तुल (कार्बाईन) हस्तगत करण्यात आले आहे. याच रायफल्स त्यांनी पहलगाम हल्ल्यात उपयोगात आणल्या होत्या, हे त्यांच्यातून सोडलेल्या गोळ्यांच्या परीक्षणातून स्पष्ट झाले आहे. जेथे हा दहशतवादी हल्ला झाला, त्या पहलगाम येथील बैसारन भागातून जप्त करण्यात आल्या होत्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफल्सचे बॅलेस्टिक परीक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यावरुन मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानचेच होते हे स्पष्ट होते. या संदर्भात शंकेला कोणताही वाव नाही, हे अमित शहा यांनी स्पष्ट केले. भारतीय सेनेने हे सर्व पुरावे योग्यरित्या संकलित केलेले असून त्यामुळे पहलगाम हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला आणि हेच दहशतवादी सोमवारी हाती घेण्यात आलेल्या ‘महादेव अभियाना’त मारले गेले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दहशतवाद ही काँग्रेसचीच देणगी
भारतात दहशतवादाचा फैलाव होण्यास काँग्रेसची राज्यसरकारचे कारणीभूत आहेत. काँग्रेसच्या बोटचेप्या धोरणांमुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास बळावला. काँग्रेसप्रणित सरकार देशात राज्य करत असताना अनेक दहशतवादी हल्ले झाले. 2008 मध्ये मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तथापि, काँग्रेस सरकारने या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे भारत सरकार दुबळे आहे अशी दहशतवाद्यांची खात्री पटली आणि त्यामुळे देशात 2004 ते 2014 या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात स्थापन झाल्यानंतर दहशतवादाला संपविण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात आली. त्यामुळे दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या सरकारने पाकिस्ताला धडा शिकविला आहे. त्यामुळे आज काश्मीर आणि अन्यत्र शांतता दिसत आहे. दहशतवादाविरोधात कठोर आणि शून्य सहनशक्तीचे धोरण स्वीकारल्याखेरीज तो नियंत्रणात येणार नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असा घणाघात अमित शहा यांनी केला.
विरोधक नेमके कोणाच्या बाजूचे...
ड विरोधी नेत्यांकडून पाकिस्तानला क्लिन चिट दिल्याचा शहा यांचा आरोप
ड मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानीच असल्याचे निर्विवाद पुरावे संकलित
ड सोमवारी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनीच पहलगाम हल्ला केल्याचेही सिद्ध
ड काँग्रेसच्या सत्ताकाळातच भारतभर दहशतवादाचा मोठ्या प्रमाणात फैलाव