दुसऱ्या लग्नाचा मोह बेततोय लहानग्यांच्या जीवावर!
जिल्ह्यात बालकांची विक्री करणारी टोळी सक्रिय : दुसऱ्या लग्नाच्या आमिषाने मानवी तस्करी, पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात लहान मुलांची विक्री प्रकरणे वाढली आहेत. केवळ महिन्याभरात तीन प्रकरणे तर सहा महिन्यांत चार घटना उघडकीस आल्या आहेत. खास करून परित्यक्ता व त्यांच्या पहिल्या लग्नापासून जन्मलेल्या अपत्यांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. दुसरे लग्न जमविण्याच्या निमित्ताने लहान मुलांच्या विक्रीचेही धक्कादायक प्रकार सुरू झाले आहेत. बेळगाव येथील माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 1, मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 1 व हुक्केरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2 असे एकूण चार गुन्हे घडले आहेत. महाराष्ट्र, गोव्यात विक्री करण्यात आलेल्या तीन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर एका बालिकेचा मृत्यू झाला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस, महिला व बालकल्याण खात्याने आणखी प्रयत्न वाढविण्याची गरज आहे.
9 जून 2024 रोजी माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील निसर्ग ढाब्याजवळ एका सव्वा महिन्याच्या नवजात शिशुची 60 हजार रुपयांना विक्री करताना कित्तूर येथील एका डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. विवाहपूर्व संबंधातून जन्मलेल्या या बालिकेची विक्री झाली होती. 20 जून रोजी मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करताना कित्तूर येथील डॉ. अब्दुलगफार लाडखान (वय 46) या डॉक्टरने गर्भपात करून आपल्या फार्महाऊसमध्ये पुरलेले अर्भक आढळून आले. विवाहपूर्व संबंधातून जन्मलेल्या शिशुला डॉक्टरकडेच सोपविण्यात आले होते. त्याने काही महिलांना हाताशी धरून या शिशुची विक्री केली होती. माळमारुती व कित्तूर पोलीस स्थानकात यासंबंधी दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर बेळगाव जिल्ह्यात लहान मुलांची विक्री कशी होते आहे? हे ठळकपणे चर्चेत आले. यापाठोपाठ 4 जानेवारी 2025 रोजी येथील मार्केट पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाला. कवठेमहांकाळ, जि. सांगली येथील राजेंद्र मेत्री व त्याची पत्नी शिल्पा राजेंद्र मेत्री, दोन वर्षांच्या मुलीला खरेदी करणाऱ्या स्मिता वाडीकर, रा. रामनगर, ता. जोयडा व मध्यस्थीची भूमिका बजावलेल्या वंदना सुर्वे, रा. वडगाव, रवी राऊत, राणी राऊत दोघेही राहणार सोलापूर यांच्यावर एफआयआर दाखल झाला. जोयडा तालुक्यातील रामनगरजवळ साडेचार लाख रुपयांना या दोन वर्षांच्या मुलीची विक्री करण्यात आली होती. मानवी तस्करी प्रकरणी एफआयआर दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. हा संपूर्ण व्यवहार जोयडा तालुक्यात झाला होता. त्यामुळे हे प्रकरण रामनगर पोलिसांकडे वर्ग करण्याचे ठरविण्यात आले. तत्पूर्वी त्या दोन वर्षांच्या बालिकेची सुखरूप सुटका केली.
सात वर्षांच्या मुलाची सुटका
या घटनेनंतर 15 जानेवारी 2025 रोजी हुक्केरी पोलीस स्थानकात मानवी तस्करी प्रकरणी एफआयआर दाखल झाला. लक्ष्मी बाबू गोलभावी (वय 38) मूळची रा. भडगाव, ता. गडहिंग्लज, सध्या रा. सुलतानपूर, ता. हुक्केरी, अनसुया गिरीमल्लाप्पा दोडमनी (वय 50) रा. केसरोळी, ता. हल्याळ, जि. कारवार, संगीता विष्णू सावंत (वय 40) रा. नागाळा पार्क, कोल्हापूर या चौघा जणांना अटक करून त्यांनी विक्री केलेल्या सात वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात आली.
चार लाख रुपयांना विक्री
हे प्रकरण मात्र दुसऱ्या लग्नातून झाले होते. संगीता कम्मार या महिलेने सुलतानपूर येथील सदाशिव मगदूम यांच्याशी दुसरे लग्न केले होते. पहिल्या पतीपासून झालेल्या अपत्याचा आपण सांभाळ करू, असे सांगत लग्नासाठी मध्यस्थीची भूमिका निभावलेल्या लक्ष्मी गोलभावी या महिलेने सात वर्षांच्या मुलाला आपल्यासोबत नेले व चार लाख रुपयांना त्याची विक्री केली. मुलाच्या विक्रीतून आलेल्या पैशापैकी 1 लाख 40 हजार रुपये या मुलाचा सावत्र बाप सदाशिव मगदूमलाही मिळाले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केवळ पाच दिवसांनी त्याच सुलतानपूरमध्ये आणखी एका मुलाची विक्री झाल्याचे उघडकीस आले. संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी (वय 40) रा. माद्याळ, ता. गडहिंग्लज, मोहन बाबाजी तावडे (वय 64) रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पिराप्पा तळवार (वय 45) रा. निवळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांना अटक करून त्यांनी विकलेल्या पाच वर्षांच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
सदर प्रकरणही दुसऱ्या लग्नातून झाले होते. अर्चना नामक महिलेने राजू मगदूम, रा. सुलतानपूर याच्याशी दुसरे लग्न केले होते. राजू आणि अर्चना या दोघांनाही पहिल्या लग्नातून अपत्यप्राप्ती झाली होती. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचे आरोग्य ठीक नव्हते. त्याच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने मोहन तावडे व संगीता तावडे यांच्या परिचयातील नंदकुमार सीताराम डोर्लेकर, नंदिनी नंदकुमार डोर्लेकर, दोघेही रा. वरवडे, ता. जि. रत्नागिरी यांना साडेतीन लाख रुपयांना विकण्यात आले होते. वरील चारही प्रकरणात आरोपींची धरपकड झाली आहे. ही प्रकरणे लक्षात घेता बेळगावसह सीमाभागात लहान मुलांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याचे लक्षात येते. महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात मुलांची विक्री करण्यात आली आहे. विवाहपूर्व संबंधातून जन्माला आलेल्या मुलांची व पहिल्या लग्नातून जन्माला आलेल्या अपत्यांची विक्री झाली आहे. परित्यक्ता महिलांना दुसरे लग्न ठरवून देण्याच्या निमित्ताने व्यवहार करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
लग्न ठरवणाऱ्या टोळीचे कारनामे वाढले
गरिबी, काही कारणास्तव पहिले लग्न मोडल्यानंतर होणारे दुसरे लग्न, पहिल्या लग्नातून झालेल्या अपत्यांची सांभाळ करण्याच्या बहाण्याने परस्पर त्यांची विक्री करण्यात येत आहे. खास करून विधवा व परित्यक्ता महिलांना या टोळीकडून लक्ष्य बनविण्यात येत आहे. दीड ते पाच लाख रुपयांपर्यंत लहान मुलांची विक्री करण्यात आली आहे. मानवी तस्करीसाठी सक्रिय असणाऱ्या टोळीतील महिलाच दुसरे लग्न ठरविण्यातही आघाडीवर असतात. खासकरून ग्रामीण भागात या लग्न ठरवणाऱ्या टोळीचे कारनामे वाढले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरीचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन प्रकरणांचा छडा लावला आहे. पोलीस व बालकल्याण विभागाने गांभीर्याने तपास केल्यास आणखी किती प्रकरणे बाहेर पडतील, याचा नेम नाही.