For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हजारो भाविक सोनुर्लीच्या माऊली चरणी लीन

05:47 PM Nov 06, 2025 IST | अनुजा कुडतरकर
हजारो भाविक सोनुर्लीच्या माऊली चरणी लीन
Advertisement

देवस्थान व्यवस्थापनाकडून जत्रोत्सवाचे चोख नियोजन

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
महाराष्ट्रातील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवाला गुरुवारी ६ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपुर्ण वातावरणात प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही भाविक सोनुर्ली नगरीत दाखल झाले होते. दिवसभरात हजारो भाविक देवीचा जयघोष करत माऊली चरणी लीन झाले.तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रौत्सवाला गुरुवारी सकाळी उत्साहात सुरवात झाली. उत्सवमुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर देवीचे दर्शन भक्तासाठी खुले करण्यात आले. यावेळी आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीची दर्शन देण्यात आले, यावेळी ओटी व केळी ठेवण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. जत्रोत्सव उत्साहात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासना बरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. तर दुपारनंतर ती अधिकच वाढत गेली. त्यानंतर सायंकाळी व रात्रौ जत्रोत्सवात भाविकांचा जनसागरच उसळला. लोटांगणापूर्वी संपूर्ण दिवस माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे, केळी ठेवण्याचा कार्यक्रम सुरु होता. सकाळ पासूनच मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. भक्तांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी देवस्थान कमिटीकडून मंडप व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवक नेमून त्याठिकाणी योग्य ती खबरदारी ठेवण्यात आली होती.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाचे सावट असल्याने देवस्थान कमिटीकडून योग्य ते नियोजन करण्यात आले होते. तर व्यापाऱ्यांकडूनही दुकानासाठी तसा बंदोबस्त करण्यात आला होता.जत्रोत्सवाकरिता सावंतवाडी एसटी डेपोतून जादा बसेस सोडण्यात आल्याने कचाकच गाड्या भरुन भाविक सोनुर्लीत दाखल होत होते. जत्रौत्सवानिमित्त माऊलीच्या प्रांगणात हॉटेल, दुकाने व इतर स्टॉलही मोठया प्रमाणात उभारलेले होते. दोन दिवस याबाबत व्यावसायिकांची लगबग दिसून आली होती. केळी, फुले यांचे स्टॉलही मोठया प्रमाणात लागले होते.कोकणातील सुप्रसिद्ध मालवणी खाज्याची दुकानेही सजली होती. विशेष म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच परप्रांतीय व्यापाऱ्यांची भरणा जत्रोत्सवात दिसून आली. आईसक्रीम ज्वेलरी दुकानांची संख्याही मोठया प्रमाणात होती. खेळण्यांची दुकाने व गृहोपयोगी वस्तुंचीही दुकाने थाटली होती. जत्रौत्सवाला येणाऱ्या भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

मंदिरात फुलांची आरास व विद्युत रोषणाई...
देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे,रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे मंदिर उजळून निघाले होते. तर गावात प्रत्येकाच्या घरी विद्युत रोषणाई असल्याने एकप्रकारे नवचैतन्य आले होते.

Advertisement

आमदार केसरकरांनी घेतले दर्शन..
सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी श्री देवी माऊलीचे सकाळी दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरवर्षी आमदार केसरकर न चुकता देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात.यावेळी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसह महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी ठेवण्याचं साकडं घातलं.उपस्थित भाविकांना त्यांनी जत्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.