महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रेक्षकांच्या अश्रूपूर्ण प्रतिक्रिया हीच कामाची पावती

12:25 PM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘आरारिरारो’ चे दिग्दर्शक संदीप कुमार यांचे प्रतिपादन

Advertisement

 

Advertisement

पणजी :  एका गावात एक वृद्ध महिला राहात असते. खूप श्रीमंतीचे जीवन जगलेली ती महिला मोठ्या महालवजा घरात वृद्धापकाळात मात्र एकाकी जीवन जगत असते. पार अंथऊणाला खिळलेली असते. तिला बोलताही येत नसते. अशावेळी एक दिवस एक चोर तिच्या घरात प्रवेश करतो. परंतु तिची परिस्थिती आणि तेथील श्रीमंती पाहून एकाचवेळी चोरी करण्यापेक्षा पुन्हा पुन्हा येऊन सामान घेऊन जावे, असा विचार त्याच्या मनात येतो. त्यानुसार पहिल्यांदा तो चोरी करतो. दुसऱ्यांदाही चोरी करतो. तिसऱ्या वेळी आलेला असताना त्याचे मन बदलते. कारण ती महिला कोणताही प्रतिकार करण्याच्या स्थितीत नसते. दुसऱ्या बाजूने चोरालाही आई नसते. त्या महिलेत त्याला आपली आई दिसू लागते. चोरीचा विचार सोडून तो तिची सेवा करू लागतो. येथेच कथेला वळण मिळते आणि पुढील कथानक घडते. अशा एकुण भावनिक आणि मनावर खोल परिणाम करणाऱ्या कथानकावर आधारित ’आरारिरारो’ हा कन्नड चित्रपट नुकताच इफ्फीत इंडियन पॅनोरामा विभागात दाखविण्यात आला. त्यानिमित्त त्याचे दिग्दर्शक संदीप कुमार आणि प्रमुख अभिनेता प्रसन्ना शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक कुमार यांनी, चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया ऐकून मन हेलावून जाते. आपल्या कार्याची हीच खरी पावती असते, असे ते म्हणाले. हा चित्रपट लोकांना खूप आवडला. त्यातील   मातृत्वाची प्रचीती ही वैश्विक अनुभूती सिनेमा पाहून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या दोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंमधून दिसत होती, असे ते पुढे म्हणाले. अभिनेता प्रसन्ना यांनी आपला अनुभव सांगताना, यापूर्वी आपण अनेक चित्रपटांमधून काम केले आहे हे खरे असले तरीही ’आरारिरारो’ मधील भूमिका आणि त्यादरम्यानचा अनुभव अत्यंत रोमांचकारी, आगळा-वेगळा होता, असे ते म्हणाले. या चित्रपटाचे चित्रिकरण केवळ 16 दिवसात पूर्ण करण्यात आले तरीही त्या काळात आम्हा प्रत्येक टीम सदस्यांमध्ये चित्रपटाच्या कथानकासारखेच नातेसंबंध जुळले. त्यातल्या त्यात आई बनलेली ती अभिनेत्री आणि चोराची भूमिका करणारा आपण यांच्यात खरे खुरे आई-पुत्राचे नाते असल्यासारखे आम्ही वागत होतो, असेही त्यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article