दुसऱ्या सहकाऱ्याच्या शोधासाठी पथक परजिल्ह्यात
चिपळूण :
तालुक्यातील धामणवणे-खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या टॅव्हल एजंट जयेश भालचंद्र गोंधळेकर याने दागिने आणि पैसे याच्या हव्यासापोटी हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात त्याच्या आणखी एका साथीदाराचा समावेश आहे. तो परजिह्यात असल्याच्या माहितीवरुन त्याच्या शोधासाठी पोलीस पथक त्या जिह्यात रवाना झाले आहे. दरम्यान, अटकेतील जयेश याला रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरालगतच्या धामणवणे-खोतवाडी येथील 63 वर्षीय प्राथमिक शाळेच्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचे हात-पाय बांधून निर्घृणपणे खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली होती. या खून प्रकरणाचा तपास वेगवान करुन पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तसेच नातेवाईकांची चौकशीही करण्यात आली होती.
या खुनाच्या तपासाकामी पोलिसांची 5 पथके तयार करण्यात आली होती. तपास सुरु असतानाच पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले होते. यात प्रामुख्याने जयेश गेंधळेकर याचे नाव पुढे आले असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या केलेल्या चौकशीअंती त्याने या खुनाची कबुली दिली. या खुनावेळी जयेश याने पळवून नेलेले सीसीटीव्ही डिव्हीआर, संगणकातील हार्डडिस्क तसेच चोरलेले दागिने व रक्कम पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहे. वर्षा जोशी या पर्यटनासाठी ठिकठिकाणी जात असल्याने त्यांना पर्यटनासाठी ट्रॅव्हल एजंट जयेश हा मदत करत असे. शिवाय जोशी यांचा जयेश हा चांगला ओळखीतील होता. जोशी यांच्याकडे असलेले दागिने तसेच पैशाच्या हव्यासापोटी जयेश याने त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे, तरी या खुनाचा रचलेला कट यामध्ये त्याच्याबरोबर आणखी एका साथीदाराचा समावेश होता. जयेश याच्या चौकशीतून या साथीदाराचाही उलघडा झाला असला तरी हा साथीदार सध्या गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा साथीदार परजिह्यातील असल्याचे पुढे येताच त्याच्या शोधासाठी पोलीस पथक त्या जिह्यात गेले आहे. हा साथीदार सापडल्यानंतर त्याच्या चौकशीतून आणखी महत्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.