सृष्टीची शिकवण
माणसाला नामस्मरणाचे महत्त्व समजले तरी ते तो आपल्या आचरणात आणेलच असे नाही. त्यासाठी कोणतेही कष्ट नसले तरी बाह्य सुखाकडे असणारी धाव त्याला प्रतिबंध करते. म्हणून की काय पूर्वजांनी घटाघटात परमेश्वराचे नाम पेरून ठेवले. लहानपणापासूनच नामाचा रुजवा कळतनकळत मनात, अंतर्मनात व्हावा म्हणून सभोवती असणारी अवघी सृष्टी नाममय करून टाकली.
साठ-सत्तर वर्षांपूर्वी घराघरात सोवळे हे फार प्रस्थ होते. विशेषत: कुटुंबातील वडीलधारी माणसे सोवळे निष्ठेने पाळत. व्रते, नियम फार कडक होते. घरामध्ये एक आचारसंहिता होती. काळ पुढे गेला तसे सारे बदलून गेले. एखादी आजी जर सोवळ्यात राहून पूजा करू लागली तर नातवंडेच तिची चेष्टा करून तिला कष्ट देऊ लागली. काळाबरोबर पावले पडायलाच हवीत. त्यानुसार सोवळ्याचे नियम शिथिल झाले. कलियुगात आचार पाळून उपासना करणे हे कठीण आहे. त्यासाठी केव्हाही, कधीही, कुठेही करता येणारी उपासना आणि साधना म्हणजे नामस्मरण. कलियुगात भगवंताच्या गोड नामस्मरणभक्तीला दुसरा पर्याय नाही.
कलियुग सुरू झाले तेव्हा कली भरतखंडातील धर्मपरायण माणसांना घाबरून पृथ्वीवर येण्यास तयार होईना; तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणाले, तुझ्याबरोबर मी आसुरी संपत्ती आणि अनुकूल काळ देतो. त्यामुळे सारे मानव तुला वश होतील. मात्र गुरूभक्ती करीत नामस्मरण करणाऱ्या भक्तांना तू त्रास देऊ नकोस. सद्गुरूंच्या भक्तांकडे तर तू पाहूसुद्धा नकोस. पू. बाबा बेलसरे म्हणतात, ‘भगवंताचे नाम जर सद्गुरूंकडून आले तर त्यात त्यांच्या तपश्चर्येची शक्ती येते. भांडवल नसताना व्यापार करून पैसे मिळवणे कठीण पडते, पण एखाद्याने जर आपल्याला भांडवल दिले तर त्या आधाराने लवकर पुढे जाता येते. तसेच सत्पुरुषाने दिलेले नाम आपण जपले तर लवकर फायदा होतो. ते नाम आपल्याला आंत-आंत मध्ये खोलवर नेते.’
श्री दत्तप्रभूंनी चोवीस गुरू केले. त्यात पंचमहाभूते आणि जीवसृष्टीतील कीटकांपासून बलाढ्या प्राण्यांपर्यंत सर्वांना गुरुत्व बहाल केले. त्यात कपोत, अजगर, पतंग, भृंग, हत्ती, मधमाशी, मृग, मासा, टिटवी, सर्प, कुंभारीण माशी आणि कोळी ही मानवेतर सृष्टी समाविष्ट आहे. माणसाला नामस्मरणाचे महत्त्व समजले तरी ते तो आपल्या आचरणात आणेलच असे नाही. त्यासाठी कोणतेही कष्ट नसले तरी बाह्य सुखाकडे असणारी धाव त्याला प्रतिबंध करते. म्हणून की काय पूर्वजांनी घटाघटात परमेश्वराचे नाम पेरून ठेवले. लहानपणापासूनच नामाचा रुजवा कळतनकळत मनात, अंतर्मनात व्हावा म्हणून सभोवती असणारी अवघी सृष्टी नाममय करून टाकली. गाय अर्थात गोमाता दृष्टीस पडली की आठवतो गोपाळकृष्ण. गोधन घेऊन रानात निघालेला. बालपणी कृष्णाने जेव्हा पहिल्यांदा गायीची धार काढली तो प्रसंग श्रीमद्भागवतामध्ये सांगितला आहे. कृष्णाने गायीच्या आचळाला नुसता स्पर्श काय केला ती गाय अनेक धारांनी दूध द्यायला लागली. पुढे मोठा झाल्यावर उपनिषदरूपी गाईचे दूध कृष्णाने काढले. ते गीतामृतम. श्रीदत्तप्रभूजवळ त्यांच्या पाठीमागे गाय उभी आहे.
गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत. गाय दिसली की नामस्मरण आपोआपच होते. शेतात राबणारे बैल दिसले की शिवापुढचा नंदी आठवतो. देवघरात नुसती शिवपिंड असून चालत नाही. तिथे नंदी हवाच. त्याशिवाय साधनेला गती नाही. रेडा हा प्राणी सहसा दृष्टीस पडत नाही. तो यमाचे वाहन म्हणून त्याचे स्मरण न होणे इष्ट असे समाजाला वाटते. परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदलले. रेड्याच्या मस्तकी माऊलींनी हात ठेवला आणि तो रेडा निष्णात पंडितांप्रमाणे वेद म्हणू लागला. तीन दिवस अखंड तो वेद म्हणत होता. पुणे जिह्यातील आळे या गावी तो मरण पावला तेव्हा ज्ञानोबा माऊलींनी आपल्या हाताने त्याची समाधी बांधली आणि दोन दिवस तिथे हरिजागर केला.
श्री दत्तप्रभूंचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘काखे झोळी पुढे श्वान.’ कोणत्याही दत्त देवस्थानात जा. तिथे श्वान असतातच. मग ते शिर्डी, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी वाडी असो. श्री दत्तप्रभूंना श्वान प्रिय आहे कारण त्याचे नाते हृदयाशी आहे. जिवाला जीव लावून प्रेम देणारा श्वान श्री दत्तप्रभूंचे स्मरण आपल्याला करवतो. देवाच्या दरबारी सर्पाचे स्थान महत्त्वाचे आहे. विष्णु भगवान हे शेषशायी आहेत. तर शंकराच्या गळ्यात सर्प आनंदाने खेळत असतात. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पोटाजवळ साप आहे. समर्थ रामदास स्वामी गणपती बाप्पाच्या आरतीत गणेशाचे वर्णन करताना म्हणतात, ‘लंबोदर पितांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना..’ नाग ही एक देवता आहे. त्याचे आणि उंदराचे वैर आहे परंतु गणपतीच्या मांडीखाली उंदीर आहे. उंदीरमामाशिवाय बाप्पाची प्रतिष्ठापना होत नाही. पूर्वी मुंगूस दृष्टीस पडत असे तेव्हा ‘मुंगसा मुंगसा तुला श्रीरामांची शपथ’ असे म्हणत. खारुताईच्या पाठीवर श्रीरामांची बोटे उमटली आहेत. शहरात घुसलेली माकडे खरे म्हणजे नासधूस करतात. परंतु वानरांना बघून दृष्टीसमोर मारुतीराय उभे राहतात आणि दर्शनाने माणूस सुखावतो. वसंतपंचमीला न दिसणारी पण आसमंत गोड आवाजाने भारून टाकणारी कोकिळा गात असते तेव्हा स्मृती संदर्भ जागे करत पार्वती मातेची गोष्ट आठवून देते. कावळा हा पक्षी माणसांमध्ये राहणारा असला तरी त्याला कोणी सहसा जवळ करत नाही. माऊली मात्र त्याला विठ्ठलाचा दूत म्हणून हाक मारत म्हणतात, ‘पैल तो गे काऊ कोकताहे शकुन गे माये सांगताहे.’ त्याचे पाय सोन्याने मढवीन असे आश्वासन देत माऊली त्याला दहिभात भरवतात.
अवतीभवती असलेली झाडे मनुष्याला परमेश्वराच्या गोड नामाची आठवण करून देतात. वड हे स्वामी समर्थांचे स्मरण करून देणारे झाड आहे तर औदुंबर हा दत्तप्रभूंचा वृक्ष आहे. बेलाचे झाड हे लक्ष्मी, दुर्गामाता व शिवाशी निगडित आहे. आवळीभोजन हा समारंभ नामसंकीर्तनाचा आहे. आवळा व लक्ष्मी यांचा जवळचा संबंध आहे. आद्य शंकराचार्य यांचे कनकधारा स्तोत्र प्रसिद्ध आहे. पारिजातक हा वृक्ष दिसला की श्रीकृष्ण, सत्यभामा व रुक्मिणी देवी आठवतात. बोरे हातात आली की प्रेममूर्ती शबरी थेट श्रीरामांची भेट घडवते. रुईची पाने साक्षात मारुती, गणेश, महादेवाकडे घेऊन जातात. आंबा व त्याची पाने मंगलसूचक आहेत. कापसाची वस्त्रs, वात याशिवाय तर पूजाच होत नाही. घेवड्याचा वेल थेट गुरूचरित्र ग्रंथापाशी नेतो. अवघी सृष्टी नाममय आहे. जिथे पाहू, जिथे जाऊ तिथे तो परमेश्वर भरला आहे. ही जाणीव आणि पदोपदी आठवण हेच खरे नामस्मरण आहे.
माणूस प्रपंचात इतका वेढलेला असतो की नामस्मरण करायला वेळ मिळत नाही हे त्याचे ध्रुपद असते. प्रपंचात रोजच्या नवीन कटकटी आहेत. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘परममुर्खामाजी मूर्ख । जो या संसारी मानी सुख। या संसारदु:खाएवढे दु:ख । आणिक नाही ?’ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत, ‘एक मनुष्य वेड्यांच्या इस्पितळात गेला. तिथे सगळे वेडेच होते. तेव्हा त्यातून शंभर वेडे जर एकत्र आणले तर एक शहाणा तयार होईल का त्यातून? तसा प्रपंच सगळा अनुकूल असूनसुद्धा सुख मिळणे अशक्य आहे’. परमपूज्य नाना महाराज तराणेकर म्हणतात, ‘प्रपंच करू नका असे नाही. पण एक लक्षात घ्या प्रपंच हा मुळातच फाटका आहे. त्याला किती ठिगळे लावत बसाल? प्रपंच करताना वेळात वेळ काढून नामस्मरण करत जा. म्हणजे प्रपंच हा सुखाचा होईल.’ सर्वांघटी राम ही सृष्टीची शिकवण परमेश्वराचे अनुसंधान सुटू देत नाही हेच खरे!
-स्नेहा शिनखेडे