टाटा समूह ऊर्जा क्षेत्रातही विस्तारणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या उद्योगविश्वाचा आधारस्तंभ असलेला टाटा उद्योगसमूह आता हरित ऊर्जा क्षेत्रातही आपला विस्तार करणार आहे. या समूहाच्या टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही ऊर्जानिर्मिती आणि वितरण या क्षेत्रात ठसा उमटविण्याची योजना या उद्योगसमूहाने तयार केली आहे.
हरित ऊर्जा क्षेत्राला भवितव्य उज्ज्वल आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हा सध्या महत्वाचा विषय असून औद्योगिक प्रदीर्घता निर्णायक ठरणार आहे. पर्यावरणस्नेही उद्योगांवर भर द्यावा लागणार आहे. हरित ऊर्जा क्षेत्र ही संधी निर्माण करुन देत असल्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करणे उपयुक्त ठरेल, अशी या उद्योगसमूहाच्या धोरणकर्त्यांची धारणा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
विविध पर्याय
हरित ऊर्जा क्षेत्रात विविध पर्याय उपलब्ध आहेत. हरित हैड्रोजन, हरित अमोनिया आदी पर्यावरणस्नेही ऊर्जेच्या प्रकारांना भविष्यकाळात मोठी मागणी येण्याची शक्यता आहे. भारत या ऊर्जाप्रकारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करु शकतो. भारतात अलिकडच्या काळात सौरऊर्जेचे उत्पादनही लक्षणीय प्रमाणात होत आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून हरित हैड्रोजन आणि हरित अमोनिया यांचे उत्पादन केले जाऊ शकते. टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड ही कंपनी या दृष्टीने कार्यरत राहणार आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनायक पई यांनी दिली.