Solapur : सोलापूरच्या कडक भाकरीची चव सातासमुद्रापार...!
रुचकर सोलापुरी कडक भाकरीला देशासह विदेशातही वाढती मागणी
by गौतम गायकवाड
सोलापूर : ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्हा सर्वांना परिचित आहे. सोलापुरी चादर, शेंगा चटणी यासोबतच कडक व रुचकर ज्वारीच्या भाकरीचाही रुबाब वाढला आहे. सोलापुरी कडक भाकरीची केवळ देशातच नव्हे तर विदेशातील नागरिकांवर भुरळ पडत आहे.ज्वारी आणि बाजरीपासून बनवलेल्या कडक भाकरीला देशाबरोबरच विदेशातही 'मोठी मागणी होत आहे.
सोलापुरात येणारा व सोलापुरातून इतर ठिकाणी जाणारा पाहुणा सोलापुरातील शेंगा चटणी व कडक भाकरीला पसंती दिल्याशिवाय जात नाही. सोलापूरची कडक भाकर आज देशभरातील मोठमोठ्या मॉलमध्येसुध्दा उपलब्ध आहे. ही मागणी लक्षात घेऊन शहर, जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटांनी कडक भाकर निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे. यामुळे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक ठिकाणी कडक भाकर मशीनच्या माध्यमातून बनवल्या जातात.
मात्र मशीनपेक्षा हातावर बनवलेल्या भाकरीलाच ग्राहकांची मागणी अधिक आहे. हातावर केलेली आणि चुलीवर भाजलेली भाकर खाल्याने आरोग्य चांगले राहते. त्यामुळे कडक भाकरीला मागणी बाढत आहे. देश-विदेशातही कडक भाकर मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. वाढती मागणी लक्षात घेऊन सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक भाकर निवण्याचे सेंटर निर्माण झाले आहेत.
होटगी रोड विमानतळ परिसरात स्वामी विवेकानंद नगरामध्ये समर्थ कडक भाकरीचे सेंटर आहे. या ठिकाणी दररोज हजारो कडक भाकरी बनवल्या जातात. केंद्राच्या उद्योजिका लक्ष्मी सिंदगी यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, आम्ही मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी गावचे. २० बषापूर्वी आमचे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी तसेच कामाच्या शोधात असताना हत्तुरे बस्ती येथे राहण्यास आलो असताना आमच्याकडे एक ग्राहक येऊन भाकरी करुन देण्याची विनंती केली. ग्राहकाला भाकरी बनवून दिल्या. रोजगाराच्या शोधात असताना हीच भाकरी एका वेगळ्या वळणावर पोहोचवेल, असे आम्हाला वाटले. त्यानुसार आम्ही इतर काम शोधण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय म्हणून भाकरीचा व्यवसायाकडे वळालो.
सुरुवातीला फक्त पाच ते दहा भाकरी करुन पाहिल्या. आम्ही भाकरी बनवून देतो ही माहिती शेजाऱ्यांना कळाली. त्यानुसार भारकीचा व्यवसायास सुरुवात झाली. ग्राहकांच्या मागणीनुसार भाकरी बनवून देण्यास सुरुवात केली. त्यानुसार आमचा व्यवसाय वाढत गेला.
वीस वर्षांत व्यवसायाची प्रगती
आज दिवसाला दोन हजार भाकरी बनवल्या जातात. याठिकाणी रोज दहा महिला भाकरी बनवतात. मागणीनुसार कडक भाकर बनवून दिली जाते. भारकीच्या व्यवसायाने आज मोठी भरारी घेतली आहे. व्यवसायामुळे दहा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याठिकाणी बनवलेल्या भाकरी ऑर्डरप्रमाणे मेस तसेच हॉटेल, ढाबे तसेच इतर ग्राहकांपर्यत पोहचवल्या जातात.