सर्वात उंच सेतूचे उद्घाटन 6 जूनला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार कार्यक्रम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण करण्यात आलेल्या चिनाब सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 जूनला केले जाणार आहे. हा सेतू अभियांत्रिकी चमत्कार म्हणून प्रसिद्धीस पावलेला असून जगातील सर्वात उंच सेतू होण्याचा सन्मान त्याने प्राप्त केला आहे. या सेतूचे नागरी आणि सामरिक अशा दोन्ही प्रकारचे महत्व असून भारताच्या देशव्यापी पायाभूत सुविधा कार्यक्रमाचा तो एक महत्वाचा भाग असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
या कार्यक्रमासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन विशेष वंदे भारत रेल्वेगाड्यांचा शुभारंभही केला जाणार आहे. या गाड्या जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि जम्मूतील कातरा यांना जोडणार आहेत. चिनाब सेतूचे उद्घाटन एप्रिलमध्ये केले जाणार होते. तथापि, प्रतिकूल हवामानामुळे तो कार्यक्रम स्थगित करावा लागला होता. तो आता 6 जूनला होणार आहे, अशी माहिती दिली गेली.
सेतूचे अनन्यसाधारण महत्व
काश्मीर खोऱ्याला ऊर्वरित भारताशी जोडणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून या सेतूकडे पाहिले जात आहे. या सेतूची संकल्पना 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातच विचाराधीन होती. या प्रकल्पाला त्यावेळी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून ओळखले गेले होते. तथापि, 2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पाची गती मंदावली होती. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला वेग देण्यात आला. आता या सेतूचे निर्माणकार्य पूर्ण करण्यात आले आहे.
प्रमुख वैशिष्ट्यो
- जगातील सर्वात उंच सेतू- हा सेतू चिनाब नदीवर असून तो नदीपात्रापासून पात्रापासून 359 मीटर किंवा 1 हजार 178 फूट उंचीवर आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वेसेतू असून फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 फूट उंच आहे.
- अत्यंत दुगर्म स्थान- हा सेतू अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ स्थानी असून त्याचे निर्माणकार्य हे अभियंत्यांसमोर मोठे आव्हान होते. तथापि, भारताच्या अभियंत्यांनी ते उत्कृष्टरित्या पेलले आणि देशाच्या सन्मानात भर टाकली आहे.
- कोणत्याही काळात कार्यरत- हा सेतू कोणत्याही हवामानात कार्यरत राहणार आहे. हिंवाळ्यात श्रीनगर ते जम्मू हा वाहनांचा मार्ग बंद होतो. जम्मू भाग जणूकाही काश्मीर खोऱ्यापासून तुटतो. ही त्रुटी या सेतूमुळे दूर होणार आहे.
- अनन्यसाधारण सामरिक महत्व- या सेतूमुळे भारतीय सैनिकांची ने-आण अत्यंत वेगाने आणि सुरळीत करणे शक्य होणार आहे. सामरिक संघर्षाच्या प्रसंगी ही बाब अत्यंत निर्णायक सिद्ध होईल. त्याच्यावरुन दारुगोळाही नेता येईल.
- जम्मू-काश्मीरची आर्थिक प्रगती- हा सेतू जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्वाचा घटक ठरणार आहे. तो कोणत्याही ऋतूत कार्यरत राहणार असल्याने कृषी आणि व्यापारी वस्तूंची आवकजावक विनाअडथळा होणार आहे.