For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा खेळाडूंनी दाखविली कौशल्याची चुणूक

06:58 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
युवा खेळाडूंनी दाखविली कौशल्याची चुणूक
Advertisement

कसोटी संघातील अननुभवाविषयीची चिंता संपुष्टात, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल यांनी उमटविली छाप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पहिल्या कसोटीतील धक्कादायक पराभवानंतर भारताच्या फलंदाजीचा अननुभवीपणा हा चिंतेचा विषय बनला होता. परंतु इंग्लंडविऊद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाल्यानंतर आता चित्र बदलले असून त्याच निर्भय संघाने मिळालेल्या संधीचे सोने करून दाखविले आहे आणि यजमानांना 2-1 अशी मोलाची आघाडी मिळवून दिलेली आहे.

Advertisement

उर्वरित दोन सामन्यांमध्ये काहीही झाले, तरी ही मालिका 22 वर्षांच्या यशस्वी जैस्वालमुळे स्मरणात राहील. त्याने फलंदाजीत आघाडीला येऊन इंग्लिश गोलंदाजांना समर्थपणे तोंड देताना पाठोपाठ दोन द्विशतके झळकावली. जैस्वालसाठी क्रिकेटमधील सुरुवातीपासूनची वाटचाल सोपी राहिलेली नाही आणि क्रिकेटच्या विविध प्रकारांतील संघांत संधी मिळाल्यानंतर त्याने आपली धावांची अतृप्त भूक दाखवून दिलेली आहे.

राजकोटमध्ये यशस्वीने ज्या प्रकारे आपली खेळी रचली ते त्याच्या वयाचा विचार करता चकीत करणारे होते. सदर खेळी म्हणजे कसोटी सामन्यातील फलंदाजीच्या दृष्टीने एक ‘मास्टर-क्लास’ होता, असे म्हणता येईल. त्याने डावाच्या सुऊवातीला अत्यंत सावधगिरी बाळगली आणि नंतर हव्या त्या वेळी षटकार खेचण्याचा निर्णय घेत दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने टाकलेल्या चेंडूंना तीन वेगवेगळ्या दिशांनी मैदानाबाहेर रवाना केले.

संघाच्या दृष्टिकोनातून राजकोट कसोटीत झालेला आणखी एक मोठा लाभ म्हणजे पदार्पण केलेला सर्फराज खान आणि यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल यांची कामगिरी. या पार्श्वभूमीवर ‘ये आज कल के बच्चे’ अशा ओळीनिशी कर्णधार रोहित शर्माने राजकोटमधील विक्रमी विजयानंतर एका दिवसाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर वरील तिघांची छायाचित्रे शेअर केली. विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या अनुपस्थितीत मधली फळी अत्यंत असुरक्षित दिसत होती. पण शेवटी मोठा ब्रेक मिळालेल्या सर्फराजने पहिल्या चेंडूपासून तो सर्वांत मोठ्या टप्प्यासाठी कसा सुयोग्य आहे हे दाखवून दिले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे त्याने जशा भरभरून धावा जमविल्या आहेत त्याच धर्तीवर कामगिरी केली.

भारतीय फलंदाज एरव्ही त्यांच्या स्वीप फटक्यासाठी ओळखले जात नाहीत. परंतु सर्फराजने त्याच फटक्याच्या आधारे बहुतेक धावा जमविल्या. तितक्या सर्रासपणे सर्फराजने रिव्हर्स स्वीप हाणला नसला, तरी त्याच्या पारंपरिक स्वीप फटक्यामुळे त्याला खूप धावा मिळाल्या आणि त्याच वेळी त्याच्या आधारे त्याने विरोधी संघावर दबाव आणला. यष्टिरक्षक या नात्याने जुरेलची कामगिरीही लक्षवेधी राहिली आणि दुसऱ्या डावात इंग्लंडचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर बेन डकेटला ज्या अप्रतिम पद्धतीने त्याने धावबाद केले ते लक्षात राहील. फलंदाजीत त्याने वेगवान गोलंदाज मार्क वूडचा एक चेंडू कसा खेळावा याविषयी झटकन निर्णय घेऊन ज्या प्रकारे तो मैदानाबाहेर फटकावला ते त्याचा आत्मविश्वास दाखविणारे होते.

स्वाभाविकपणे रोहित शर्मा आनंदित झालेला आहे आणि अननुभवी खेळाडूंच्या प्रयत्नांना त्याने तत्परतेने दाद दिलेली आहे. ‘असा सामना जिंकणे आणि तोही विशेषत: अशा तऊण संघासह हे खूप चांगली भावना निर्माण करून जाते. आमच्याकडे दोन नवोदित खेळाडू (सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल) होते आणि अंतिम संघातील अनेक खेळाडू फारसे कसोटी सामने खेळलेले नव्हते. बरेचसे श्रेय या तऊण खेळाडूंना जाते, ज्यांनी मैदानात येऊन खूप धैर्य दाखवले. असे वाटते की, ते याच स्तरासाठी बनलेले आहेत आणि त्यांना येथेच राहायचे आहे’, असे रोहितने रविवारच्या मोठ्या विजयानंतर सांगितले. दुसऱ्या बाजूने, इंग्लंडकडून जैस्वालची जास्त स्तुती झालेली आहे आणि डकेटने त्याला ‘सुपरस्टार इन दि मेकिंग’ असे संबोधले. आहे.

Advertisement
Tags :

.