तबला अबोल झाला!
भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ तारा आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झालेली आहे. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा तो कसा जगला आणि त्याने आपल्या पाठीमागे काय ठेवलंय, हे महत्त्वाचं आहे. व्यवहारात पैशाना प्रचंड महत्त्व आहे. परंतु, माणूस म्हणून जगताना त्याने नेमके काय योगदान आपल्या आयुष्यात दिले, त्यावरून माणसाचे श्रेष्ठत्व आणि महत्त्व हे कायम राहते. भारतीय संगीत क्षेत्रात शास्त्राrय वादन असो वा अन्य कोणतेही गायन असो, त्या गायनात तबल्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तबला हे संगीत क्षेत्राला साथ म्हणूनच त्याकडे पाहिले जाते, परंतु तबल्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त करून देण्याचे जर कोणी महत्त्वाचे योगदान दिले असेल तर ते उस्ताद झाकीर हुसेन यांनी. केवळ तबल्याचा स्वतंत्र कार्यक्रम तयार करून त्यावर हजारो लोकांनी फिदा व्हावे अशी कोणती जादू झाकीर हुसेन यांच्यामध्ये होती! या प्रश्नाचे उत्तर केवळ ज्यांनी ज्यांनी त्यांचे कार्यक्रम प्रत्यक्ष पाहिले असतील त्यांनीच तो स्वर्गीय अनुभव घेत ला असावा. गानकोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या गोव्यामध्ये देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबल्यावर श्रीकृष्ण व राधा यांच्या दरम्यानचे संवाद, एवढेच नव्हे तर राधेच्या पायातील घुंगरू आणि त्याचा नादमधुर स्वर हे सर्व तबल्यावर बोलून दाखवले आणि संपूर्ण सभागृह प्रचंड टाळ्यांच्या गर्जनेत न्हाऊन गेले. या ऐतिहासिक प्रसंगी लता मंगेशकर यांनी आपल्या बोटातील अंगठी काढून झाकीर हुसेन यांच्या बोटात घातली आणि हा माझा तुला आशीर्वाद असे जाहीर केले. त्या प्रसंगाने सद्गतीत झालेल्या झाकीर हुसेन यांनी लताजींच्या पायावर डोके ठेवले. हा प्रसंग आजही कोणीही विसरू शकत नाही. तबला बोलू शकतो यासाठी या कलाकाराच्या बोटात विलक्षण जादू होती. आज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर तबला स्तब्ध झाला... तबला शांत झाला! तबल्याच्या डोळ्यांतूनही अश्रू निघाले, असे म्हणावे लागेल. 9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेल्या झाकीर हुसेन यांना आपले वडील अल्लारखाँ यांच्याकडून अत्यंत लहान वयात दीक्षा मिळाली. वयाच्या तिसऱ्या वर्षी सफाईदार तबला वाजवून हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होईल यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले होते. वडिलांनी जोर धरला आणि वयाच्या सातव्या वर्षी उस्ताद झाकीर हुसेन यांनी प्रत्यक्ष कार्यक्रम सादर केला. पहिल्याच कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठमोठ्या कलाकारांकडून वाहवा मिळविली. यशाची ही पहिली पायरी ओलांडल्यानंतर या कलाकाराला कधी मागे पहावे लागले नाही. यशाची शिखरे ओलांडीत हा कलाकार पुढे पुढे पोहोचला. तबला हे वाद्य दुय्यम नसून ते किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रत्येक अदाकारीतून त्यांच्या अविष्कारातून दिसून आली. केवळ भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र आपले नाव त्यांनी अजरामर करून टाकले. तबला म्हणजेच झाकीर हुसेन याचे समीकरण होण्यासाठी अथक प्रयत्न आणि त्यासाठी समर्पणाची भावना या कलाकाराने ठेवली. त्याच्या एकंदरीत जीवनातील यशाला तेव्हा मोहोर आला जेव्हा 1988 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. इसवी सन 2002 मध्ये पद्मभूषण आणि इसवी सन 2023 मध्ये पद्मविभूषणने भारत सरकारने या महान गुणी कलाकाराचा यथोचित सन्मान केला. धर्माने मुस्लिम असला तरी श्री गणेशाचा तो भक्त होता. भगवान श्रीकृष्ण ही त्याची प्रेरणा होती. तमाम रसिक हेच शेवटपर्यंत त्याचे आराध्य दैवत होते. क्वचितच अशा एखाद्या कलाकाराला शेवटपर्यंत जनता साथ देते. आजवर या कलाकाराने केलेली आराधना, उपासना कलेवर केलेले प्रेम आणि हे करीत असताना त्याची कला कधीही त्याच्या डोक्यात घुसली नाही तर विनम्रता हा त्याचा स्थायीभाव राहिल्याने हा कलाकार नेहमीच तमाम रसिक प्रेक्षकांच्या थेट हृदयात स्थिरावला. अब्जावधी रसिकांचा आवडता कलाकार म्हणून झाकीर हुसेनकडे जग पाहायचे. असे भाग्य एखाद्याला मिळते. यासाठी तपस्या ही अत्यंत महत्त्वाची असते. कलाकाराला जात, पात, धर्म काहीही नसतो. जनता त्याच्याकडे केवळ आणि केवळ कलाकार म्हणूनच पाहत असते. केवळ नाव झाकीर हुसेन बाकी सर्व भारतीय परंपरेशी एकनिष्ठ असलेल्या या कलाकाराने सॅन फ्रांसिस्को येथे देह ठेवला. त्यांचे वडील अल्लारखाँ हे फार मोठे तबलावादक होते मात्र प्रत्यक्ष जादूची बोटे उस्ताद झाकीर हुसेन यांना प्राप्त झालेली. जन्माला मुंबईत आला. मुंबईत वाढला. तिथेच पदवी शिक्षण घेतले आणि वयाच्या अकराव्या वर्षी अमेरिकेमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात तबलावादनाचे काम केले. त्यांच्या या कलेला जो काही प्रतिसाद आला त्यातून अनेक भारतीयांना हे रत्न आपल्या नजरेत जपून ठेवावेसे वाटले. तबल्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम उस्ताद झाकीर हुसेन यांनी केले. सन 2009 मध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार त्यांनी प्राप्त केला. अलीकडेच तीन वेगवेगळ्या अल्बमसाठी देखील त्यांनी तीन ग्रॅमी पुरस्कार प्राप्त केले. असे ऐकायला मिळते की नेहमीच तबला आपल्या मांडीवर ठेवायचे. सुऊवातीच्या गरीब परिस्थितीत दिवस काढत होते. त्यावेळी झोपताना देखील तबल्याला कोणाचा पाय लागणार नाही, याची दखल घेत काही वेळा ते आपल्या मांडीवर तबला ठेवून झोपी जायचे. तबल्याला आपले दैवत मानायचे. नवीन कलाकार येतील, ते पुढे जातील, परंतु झाकीर हुसेन यांची जागा कोणी घेऊ शकणार नाही. आज या देशात असंख्य नामवंत कलाकार जरी असले तरीही लता मंगेशकर यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. या कलाकाराकडून भरपूर काही शिकण्यासारखे होते. अशा मोठमोठ्या कलाकारांना अनेक देशांमध्ये असलेली मागणी पाहता भारतीय कला अनेक देश आपल्याकडे उचलून घेत आहे आणि आम्ही भारतीय आम्हाला कला हवी ते केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून. कलेला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी तसे गुण अंगात असणे आवश्यक आहे. आपल्या जीवनात आपण बरेच काही मिळवितो परंतु आपल्या पश्चात नेमके काय राहते असा विचार अनेकवेळा येतो. झाकीर हुसेन यांनी मात्र आपल्या पश्चात तबला, त्यांची जादुई बोटे आणि जगातील सर्वोत्कृष्ट कला आपल्या पाठीमागे ठेवली. अनेक सन्मानाना ते पात्र ठरले. पद्मविभूषण झाकीर हुसेन आज हयात नसले तरी त्यांचा तबला अनंतकाळ बोलत राहणार, निनादत राहणार आहे. त्यांची प्रेरणा घेऊन नवीन कलाकार तेवढ्याच तोडीचे नव्हे, त्याहीपेक्षा मोठे निर्माण होऊ द्या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.