सर्वधर्म समभावाचे गोडवे अन् संघाचे कडवे!
यापूर्वीही प्रसिद्ध कवी निसार अहमद यांच्या हस्ते दसऱ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. म्हैसूरचे दिवाण मिर्झा इस्माईल यांनीही दसरोत्सवाचे उद्घाटन केले होते. मग बानू मुश्ताक या नावालाच विरोध का? असा प्रश्न गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी उपस्थित केला आहे. म्हैसूर राजघराण्याचे खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी तर धार्मिक भावनांना धक्का पोहोचू नये, अशा पद्धतीने दसरोत्सवाचे उद्घाटन करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकात मंगलमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुणे-मुंबईनंतर बेळगावच्या गणेशोत्सवाला एक वेगळीच परंपरा आहे. आता गणेशोत्सवानंतर दसऱ्याची प्रतीक्षा आहे. प्रसिद्ध म्हैसूर दसऱ्याच्या उद्घाटनासाठी बुकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या मुद्द्यावरूनही कर्नाटकात राजकारण तापले आहे. दसऱ्याच्या उद्घाटनासाठी बानू मुश्ताक कशासाठी? चामुंडेश्वरी देवीचे अस्तित्व त्या मानणार आहेत का? असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आदी नेत्यांनी याला विरोध केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्य सरकारने मात्र याचे समर्थन केले.
यापूर्वीही प्रसिद्ध कवी निसार अहमद यांच्या हस्ते दसऱ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. म्हैसूरचे दिवाण मिर्झा इस्माईल यांनीही दसरोत्सवाचे उद्घाटन केले होते. मग बानू मुश्ताक या नावालाच विरोध का? असा प्रश्न गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी उपस्थित केला आहे. म्हैसूर राजघराण्याचे खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी तर धार्मिक भावनांना धक्का पोहोचू नये, अशा पद्धतीने दसरोत्सवाचे उद्घाटन करण्याची मागणी केली आहे.
बानू मुश्ताक या नावावरून साहित्य, धर्म, हिंदू आणि मुसलमानांच्या प्रथा, परंपरा, भावना, देवावरील विश्वास आदी मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. भाजपने विरोध करूनही साहित्यिक बानू मुश्ताक यांनी दसरोत्सवाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आपण स्वीकारले आहे, तितक्याच आदर व प्रेमाने आपण उद्घाटन करणार आहे, असे सांगतानाच उद्घाटनासाठी निमंत्रित करणाऱ्या राज्य सरकारचे बानू मुश्ताक यांनी आभार मानले आहे. बानू मुश्ताक मूर्तीपूजा मानत नाहीत. मग चामुंडेश्वरी देवीचे पूजन कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपल्यावर होणाऱ्या टीकांना स्मितहास्यानेच उत्तर देत जी टीका सुरू आहे, त्याकडे आपण लक्ष देणार नाही. सर्वधर्मियांकडे आपण आदरानेच पाहते. चामुंडेश्वरी देवी तुम्हा-आम्हा सगळ्यांची आई आहे. या भावनेचाही आपण आदर करतो, असे सांगत बानू मुश्ताक यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप नेत्यांनी मात्र वाद जिवंत ठेवला आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजेला थारा नाही. बानू मुश्ताक यांनी चामुंडेश्वरीचे पूजन केले तर त्यांना त्यांच्या धर्मातून बाहेर घातले तर काय करणार? असे प्रश्न उपस्थित करतानाच बानू मुश्ताक यांच्या हस्ते चामुंडेश्वरी देवीचे पूजन का करावे, यासाठी हिंदू धर्मियामध्ये कोणी मिळाले नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करीत विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांचे सरकार हिंदू धर्माला कलंक लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दसरा हे एक धार्मिक आचरण नव्हे, हे एक सांस्कृतिक आचरण आहे. दसऱ्यामध्ये सर्वधर्मियांचा सहभाग असतो. चामुंडेश्वरी देवीचा डोंगरही केवळ हिंदूंची मालमत्ता नाही, असे सांगत धर्मदंगल छेडले आहेत. खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी चामुंडेश्वरीचा डोंगर हा हिंदूंचाच आहे, अशा शब्दात उत्तर दिले आहे. दसऱ्या आधीच उद्घाटनावरून राजकीय नेत्यांचा शिमगा सुरू झाला आहे.
हा वाद सुरू होण्याआधी आणखी एक राजकीय वाद उफाळला होता. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेत विरोधकांना उत्तर देण्याच्या भरात संघगीत म्हटले होते. अनेक काँग्रेसजनांनी याला विरोध केला आहे. तुम्ही प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहात. महात्मा गांधीजींची ज्यांनी हत्या केली, त्याच संघाचे गोडवे गाणे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही माफी मागा, अशी मागणी काँग्रेसचे नेते व विधान परिषद सदस्य बी. के. हरिप्रसाद यांनी केली. ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, ज्या संघटनेवर अनेक वेळा बंदी घातली होती, त्या संघटनेचे गुणगान कशासाठी गाता? असा प्रश्न उघडपणे विचारण्यात आला आहे. या मुद्द्यावर वादंग वाढताच डी. के. शिवकुमार यांनी माफी मागितली आहे. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यावर टीका करण्याच्या भरात शिवकुमार यांनी विधानसभेत ‘नमस्ते सदा वत्सले’ गायिले होते. काँग्रेसमधील अनेक शिवकुमार विरोधकांनी याला विरोध करीत हायकमांडचे लक्ष वेधले होते.
पुढील दोन ते तीन महिन्यात मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर डी. के. शिवकुमार भाजपमध्ये जाणार का? त्यामुळेच हळूहळू ते हिंदुत्वाकडे झुकत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा विरोध झुगारून शिवकुमार यांनी कुंभमेळ्यात सहभागी होऊन गंगेत डुबकी मारली होती. त्यानंतर महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या निमंत्रणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत सहभागी झाले होते. या मुद्द्यावरही त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी टीका केली होती. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत गायल्यानंतर अनेक काँग्रेसजनांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्रिपद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये जाणार की काय? अशी चर्चाही सुरू झाली आहे. आपल्या रक्तातच काँग्रेस आहे. जन्म काँग्रेससाठी झाला आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच मरणार आहे. असे असताना आपल्या पक्षनिष्ठेवर संशय का घेतला जात आहे? ते मूर्ख आहेत. असे सांगत शिवकुमार यांनी विरोधकांना मूर्ख ठरवले आहे.
आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले नाही. आर. अशोक यांच्यावर टीका करण्याच्या भरात संघगीत म्हटले आहे. आपल्यातील काही असंतुष्ट ज्येष्ठांनी यावर वादंग माजवले आहे. आपली पक्षनिष्ठा किती आहे? हे हायकमांडला माहिती आहे. संघगीत म्हटले म्हणून काही संघाचे कौतुक केलो, असे होत नाही. तरीही आपले नेते व कार्यकर्ते दुखावले असतील तर आपण त्यांची माफी मागतो, असे सांगत शिवकुमार यांनी जाहीर माफी मागितली आहे. पक्षांतर्गत विरोध काहीही असला तरी शिवकुमार सौम्य हिंदुत्वाकडे झुकत आहेत का? असा संशय समर्थकांबरोबरच विरोधकांच्या मनातही बळावत चालला आहे. धर्मस्थळच्या मुद्द्यावरही हा एक षड्यंत्र आहे, तो षड्यंत्र काय आहे? याची आपल्याला कल्पना आहे. एसआयटीच्या तपासातच ते उघडकीस होणार आहे, असे सांगत शिवकुमार यांनी भाजपलाही थंड केले होते. सध्या विधानसभेत त्यांनी गायलेले संघगीत व दसरोत्सवाच्या उद्घाटनासाठी साहित्यिक बानू मुश्ताक यांना सरकारने दिलेले निमंत्रण या दोन मुद्द्यांवर वाद सुरू झाला आहे.