Kolhapur : ‘स्वरानुभूती’ कार्यक्रमाने दिवाळी उत्सवात भक्तीचा भरला रंग !
तरुण भारत संवाद, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीतर्फे आयोजन
कोल्हापूर: रामस्तुती, विठू नामाचा गजर अन् अंबेचा जागर करत ‘तरुण भारत संवाद’ आणि ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी’ तर्फे आयोजित ‘स्वरानुभूती’ ही संगीतमय दिवाळी पहाट मंगळवारी पहाटे मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात अन् सळसळत्या उत्साहात पार पडली. सुप्रसिद्ध गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड, सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आणि सुप्रसिद्ध गायक कौस्तुभ गायकवाड यांनी सादर केलल्या भक्ती, भावगीत अन् सदाबहार सिनेगीतांना रसिक श्रोत्यांनी टाळ्यांची साद अन् शिट्ट्dयांनी दाद दिली. त्यांच्या सुरेल आवाजात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
तरुण भारत संवाद आणि लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीतर्फे दीपावलीनिमित्त स्वरानुभूती या संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंगळवार पेठेतील देवल क्लब येथे सकाळी साडे सहा वाजता या संगीत कार्यक्रमास सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनचा कंठ संगीतरत्न पुरस्कार प्राप्त गायक व संगीतकार, सारेगमप लिटिल चॅम्प्स महाविजेती सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आणि गौरव महाराष्ट्राचा महाविजेत सुप्रसिद्ध गायक कौस्तुभ गायकवाड यांनी एकापेक्षा एक अशा भाव, भक्तीगीते अन् सिनेगीतांचे सादरीकरण केले.
मंगळवार पेठेतील गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात स्वरानुभूती संगीतमय दिवाळी पहाट या कार्यक्रमासाठी पहाटे पाच वाजल्यापासुनच रसिक श्रोत्यांनी हजेरी लावण्यास प्रारंभ केला. काही वेळातच संपूर्ण सभागृह रसिकांच्या गर्दीने फुलून गेले. कुर्ता, नऊवारी साडी अशा पारंपरिक वेशभूषेत बहुतांश श्रोत्यांनी उपस्थिती लावली. पारंपरिक वेशभूषेत रसिक श्रोत्यांनी केलेल्या गर्दीमुळे सभागृहातील वातावरण आनंददायी अन् उत्साही बनले होते. रसिकांच्या या उत्साहाला चैतन्यदायी वातावरण देण्याचे काम कार्तिकी आणि कौस्तुभ गायकवाडने त्यांच्या सुरेल आावाजातून केले.
साधारणत: सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पंडित कल्याणजी, कार्तिकी आणि कौस्तुभ गायकवाड यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. व्यासपीठावर त्यांचे आगमन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रामस्तुतीने कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर अवघे गरजे पंढरपूर, घागर घेवून निघाली पाण्यागवळणी, अंबेचा गोधळ, जागर, देवा रे देवा देवा, खंडेरायाच्या लग्नाला, रेश माझ्या रेघांणी.. लाल काळ्या धाग्यांनी अशी भाव, भक्ती, लावणी अन् सिनेगीतांचे सादरीकरण केले.
सुगम संगीतातून सकारात्मक उर्जा
पहाटेच्या प्रहरात सुप्रसिद्ध गायक कार्तिकी आणि कौस्तुभ यांनी भावगीत, भक्तीगीत, लावणी, सिनेगीतांचे सादरीकरण करत रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले. सुगम संगीतातून पहाटे निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणात एक साकारात्मक उर्जा निर्माण झाली होती.
लल्लाती भंडारला वन्स मोअर
भावगीत, भक्तीगीतांच्या सादरीकरणानंतर कार्तिकी गायकवाय यांनी जोगवा चित्रपटातील लल्लाती भंडार या गीताचे सादरीकरण केले. या गीताला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांनी दाद दिली. तसेच गीताला वन्समोअरची मागणी केली. रसिकांची मागणीचा मान ठेवत कार्तिकी यांनी या गीताचे पुनश्च: सादरीकरण केले. तर कौस्तुभ यांनी सादर केलेल्या आम्ही लग्नाळू या गीतालाही वन्समोअर मिळाला.
रसिक श्रोत्यांनी धरला ठेका
कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात कार्तिकी यांनी रेश माझ्dया रेगांनी या लावणीचे सादरीकरण केले. यानंतर खंडेरायाच्या लग्नाला बाई नवरी नटली आणि खंडेरायाच्या लग्नाला या सिनेगीतांचे सादरीकरण केले. यासर्व गाण्यांवर उपस्थित रसिक श्रोत्यांनी ठेका धरला.