सोमनाथमध्ये गुरुवारपासून ‘स्वाभिमान पर्व’
भक्ती अन् भव्यतेचा संगम अनुभवता येणार : 11 जानेवारीला पंतप्रधान मोदींची मुख्य उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात गुरुवार, 8 ते रविवार, 11 जानेवारी दरम्यान भव्य-दिव्य ‘स्वाभिमान पर्वा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भक्ती आणि भव्यतेचा संगम दिसणार असून अखेरच्या दिवशी म्हणजेच 11 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुख्य उपस्थिती लाभणार आहे. सलग चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. यानिमित्ताने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ नावाच्या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाची सुरुवात होईल.
सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या माध्यमातून भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा, श्रद्धा आणि स्वाभिमान मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमादरम्यान धार्मिक विधी, आध्यात्मिक प्रवचने, सांस्कृतिक सादरीकरणे आणि सामाजिक जागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. स्थानिक प्रशासन आणि ट्रस्टने पंतप्रधानांच्या भेटीसाठी तयारी तीव्र केली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेसोबतच भाविकांच्या सोयीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
सोमनाथ मंदिरात आयोजित करण्यात आलेला सोहळा राजकारणाशी जोडलेला नसून तो भारताची ओळख, स्वाभिमान, अस्तित्व आणि भविष्याशी संबंधित असल्याचे भाजप प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले. प्रत्येक देशाच्या इतिहासात असे काही प्रसंग आणि तारखा असतात जे वेदनादायक असले तरी, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सदैव स्मरणात राहणे महत्त्वाचे आहे. आजपासून बरोबर एक हजार वर्षांपूर्वी याचदिवशी महमूद गझनवीने सोमनाथ मंदिराचा नाश केला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
सोमनाथ मंदिराचे धार्मिक महत्त्व
सोमनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मानले जाते. त्याचे विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. सोमनाथ हे केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धेचे प्रतीक आहे. या मंदिराचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो, पुण्य मिळते आणि इच्छित इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. म्हणूनच सोमनाथ हे भारताच्या आत्म्याचे आणि त्याच्या शाश्वत परंपरेचे प्रतीक मानले जाते.