अंबाबाई मंदिर, हेरिटेज वास्तूंचा परिसर उजळणार
कोल्हापूर :
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात म्युझिकल पोल तसेच शहरातील प्रमुख हेरिटेज इमारतींच्या मार्गावर हेरिटेज पोल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. पोलवर दिवे बसविण्याचे काम सध्या सुरु झाले असून यामधील म्युझिकल पोलचे काम महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे रंकाळा तलावाप्रमाणेच आता अंबाबाई मंदिरासह शहरातील हेरिटेज वास्तू असणारा परिसरही उजळून निघणार आहे.
भाविक किंवा पर्यटक कोल्हापुरात आल्यानंतर एक दिवस वास्तव कसे करतील, यासाठी आता प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अंबाबाई मंदिराच्या परिसरातील प्रमुख रस्त्यांवर म्युझिक पोल्स उभारण्यात येत आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिरातील आरती, मंत्रोच्चार ऐकण्यास मिळणार आहे. जिल्हा नियोजन मंडळातील पर्यटनस्थळाच्या मूलभूत विकास योजनेंतर्गत यासाठी दोन कोटी 65 लाखांचा निधी मिळाला आहे. महापालिकेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
अंबाबाई मंदिर परिसरातील म्युझिकल पोलप्रमाणेच शहरातील हेरिटेज इमारतीच्या परिसरात हेरिटेज पोल उभारले जात आहेत. यासाठी 2 कोटी 85 लाखांचा निधी मिळाला आहे. असे एकूण 120 पोल शहरात असणार आहेत. महिन्या अखेरपर्यंत यापैकी म्युझिकल पोलचे काम पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिर परिसर उजळून निघणार आहे. पुढील महिन्यात शहरातील प्रमुख हेरिटेज वास्तू असणाऱ्या मार्गावरील पोलवरील विद्युत रोषाणाई सुरू होणार आहे.
- काम पूर्ण करण्यासाठी अडथळ्यांची शर्यंत
रस्त्यांच्या कामामुळे काही ठिकाणच्या म्युझिकल पोल बसविण्यासाठी अडथळा निर्माण झाला. आता सीपीआर चौक ते जयंती नाला या परिसरातील पोल उभारण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. यावर उपाययोजना करून पोल उभारले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या संबंधित विभागाकडून दिली जात आहे.
- दिवे बसविण्याचे काम गतीने
100 कोटींच्या रस्त्याची कामे झाल्यानंतर पुन्हा रस्त्यांची खुदाई करावी लागू नये म्हणून येथील रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच केबल टाकून फौंडेशनही उभारले होते. जानेवारीमध्ये ही कामे पूर्ण झाली होती. आता येथील पोलवर दिवे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
म्युझिकल पोलसाठी निधी - 2 कोटी 65 लाख 6 हजार 758
निधी मंजूर - 24 ऑगस्ट 2023
हेरिटेज पोलसाठी निधी - 2 कोटी 85 लाख
पोलची संख्या -120
- म्युझिकल पोलचा परिसर
मिरजकर तिकटी ते बिनखांबी मंदिर
बिनखांबी मंदिर ते संपूर्ण महाद्वार रोड
शिवाजी चौक ते भवानी मंडप
भवानी मंडप ते बिंदू चौक
- हेरिटेज पोलचा परिसर
बिंदू चौक ते शिवाजी चौक
शिवाजी चौक ते सीपीआर चौक
सीपीआर चौक ते दसरा चौक
दसरा चौक ते बिंदू चौक