स्वाभिमानीच्या उपाशी कार्यकर्त्यांसाठी आजूबाजूच्या गावांनी केली जेवणाची सोय
कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे बेंगलोर राष्ट्रीय मार्गावर सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले आहेत. गेल्या वर्षीच्या उसाला चारशे रुपये आणि यंदाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी दाखल झाले असून बेमुदत आंदोलन हे सुरू राहणार आहे. यामुळे स्वाभिमानी कडून आता आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आंदोलन स्थळाच्या बाजूलाच असलेल्या जागेत चूल मांडून स्वयंपाक करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आलयं. सकाळी दहा वाजल्यापासून पुणे बेंगलोर महामार्ग रोखून धरलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्वयंसेविकांकडून अल्पोपोहाराची सोय करण्यात आली आहे. महामार्ग जवळील पुलाची शिरोली वसगडे इत्यादी गावातील स्वयंसेवकाकडून तांदूळ आणि आमटीच्या साहित्यासह गॅस आणि मोठी भांडी उपलब्ध केली आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते उपाशी आहेत. त्यांची भूक ओळखून आजूबाजूच्या गावांनी स्वतःहून जेवणाची सोय केली आहे.