‘सर्वोच्च’ला मिळणार दोन नवे न्यायाधीश
न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय कायदा मंत्रालयाने न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांची नियुक्ती पुढील आठवड्यात होण्याची शक्मयता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच कागदोपत्री काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही न्यायाधीशांनी शपथ घेतल्यानंतर सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या 34 होईल. सध्या जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होणारे मणिपूरचे पहिले न्यायाधीश असतील. न्यायमूर्ती आर महादेवन हे मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 11 जुलै रोजी दोन्ही न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केली होती.