वेदांताच्या मागणीला ‘सर्वोच्च’ नकार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वेदांता स्टर्लाईड या कंपनीने सादर केलेली, तुथूकुडी तांबेनिर्मिती प्रकल्पासंबंधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तामिळनाडूतील हा प्रकल्प बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिला होता. या आदेशाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका या कंपनीने सादर केली होती.
हा प्रकल्प प्रदूषणाच्या कारणामुळे सहा वर्षांपूर्वी बंद करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. केवळ औद्योगिक लाभांपेक्षा जनतेचे प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचे अधिकार मोठे आहेत, असे कारण दाखवत सर्वोच्च न्यायालयाने हा प्रकल्प बंदच ठेवण्याचा आदेश दिला होता.
उद्योग बंद करणे अयोग्य, पण...
कोणत्याही उद्योग बंद करण्याला न्यायालय कधीच प्राधान्य देत नाही. तथापि, या प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने जे आदेश दिले होते, त्यांचे पालन कंपनीने केलेले नाही. सातत्याने या आदेशांचा भंग करण्यात येत आहे. ही बाब गंभीर आहे. या प्रकल्पामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून ते तेथील जनतेसाठी असहनीय होत असल्याने प्रकल्प बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीत स्पष्ट केले होते.