परमेश्वराच्या अत्यंत श्रेष्ठ अशा स्वरूपाला अव्यक्त असे म्हणतात
अध्याय आठवा
माऊली म्हणाले, ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की, अव्यक्तात असलेले जग आकारास येते आणि त्यांची रात्र झाली की, हे जग पुन्हा अव्यक्तात जाते. हा क्रम अखंड चालू आहे. त्या एका दिवसात प्राणीमात्रांचे हजारो जन्म होत असतात. हा जन्म-मरणाचा फेरा फक्त हरिभक्त चुकवू शकतात. मायेतून विश्वाची निर्मिती होणे कालांतराने ते नष्ट होणे तसेच परमेश्वराचे नित्य असणे ह्या माउलींच्या सांगण्याची अनुभूती, अधियज्ञ करून ईश्वराची अनन्य भक्ती करणारे भक्त सदोदित घेत असतात कारण ते त्याच्याशी एकरूप झालेले असल्याने चिरंजीव किंवा अमर झालेले असतात. ते ब्रह्म लोकाच्याही पलीकडे असलेल्या वैकुंठलोकात ईश्वरस्वरूप होऊन रहात असतात. त्यांनी ह्या अध्यायाच्या ध्येयविषयानुसार अक्षरब्रह्माशी योग साधलेला असतो. ते ईश्वराशी एकरूप होऊन ह्या अव्यक्त असलेल्या आणि व्यक्त होणाऱ्या जगाच्या पलीकडे असलेल्या अव्यक्तात नित्य अशा परमेश्वरासोबत रहात असतात. ते त्यांच्या मर्जीनुसार लोकांचे कल्याण करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांचे विहित कार्य पूर्ण झाल्यावर त्यांच्या इच्छेनुसार वैकुंठलोकात परत जातात. माऊलींच्या सांगण्याची प्रचिती देणारे अनेक अवतारी पुरुष, संत आपल्याला माहीत आहेत. प्रत्यक्ष माऊलीही अवतारी पुरुष होतेच.
ह्यावरून लक्षात येते की, प्रत्येकाने हरिभक्ती करून आत्मोद्धार करून घ्यावा ती करत असताना वाट्याला आलेले कर्म निरपेक्षतेने करावे म्हणजे प्रत्येकाने आपला स्वधर्म पाळावा. अर्जुन क्षत्रिय होता त्यामुळे दुष्टांचा नाश करून सज्जनांचे संरक्षण करणे हा त्याचा स्वधर्म होता परंतु नातेवाईकांच्या मोहात पडून त्याला स्वधर्माचा विसर पडला म्हणून दुसऱ्या अध्यायात मनुष्याचा देह नाहीसा झाला तरी त्याचा आत्मा अमर असतो ही बाब लक्षात आणून देण्यासाठी सध्या आपण अभ्यासत असलेल्या व्यक्त आणि अव्यक्त स्थितीचा भगवंतांनी उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात, प्राणी काही काळ अव्यक्तातून व्यक्त होतात आणि कालावधी संपला की परत अव्यक्तात जातात परंतु त्यांचे आत्मतत्व नष्ट होत नसल्याने त्यांच्या शरीराचा नाश झाला तरी अर्जुना तू शोक करू नकोस. तो श्लोक असा,
भूतांचे मूळ अव्यक्ती । मध्य तो व्यक्त भासतो? पुन्हा शेवट अव्यक्ती । त्यामधे शोक कायसा ।। 2.28 ।। भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश आपल्यालाही लागू आहे.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, त्या अव्यक्तास अक्षर असे म्हणतात. ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. त्या अव्यक्तात प्रवेश मिळवणे हीच परम किंवा अत्यंत श्रेष्ठ गती होय. ती मिळाल्यावर प्राण्याचे जन्ममृत्यूचे चक्र संपून जाते.
त्यास अक्षर हे नाम ती चि शेवटची गति । माझे परम ते धाम जेथूनि परते चि ना ।। 21 ।।
माउली म्हणतात परमेश्वराच्या अत्यंत श्रेष्ठ अशा स्वरूपाला अव्यक्त असे म्हणतात हे अव्यक्त दिसत नसलेल्या मायेच्या पलीकडे असते. ह्या ब्रह्माला अक्षर म्हणजे नष्ट न होणारे असे म्हणतात. ह्याच्या पलीकडे काही एक विस्तार नसतो म्हणून हीच परमगती होय.
क्रमश: