सर्वोच्च न्यायालयाने हुकूमशाही चिरडली!
मुख्यमंत्री केजरीवालही लवकरच तुरुंगाबाहेर येतील : सिसोदियांचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मद्य धोरण प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर कारागृहाबाहेर पडलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी आप कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचा आधार घेत हुकूमशाहीला ठेचून काढले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही लवकरच बाहेर येतील. देवाच्या घरी विलंब आहे, अंधार नाही, असे स्पष्ट केले. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी सीबीआयने आणि 9 मार्च 2023 रोजी ईडीने दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अटक केली होती. 17 महिन्यांनंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते तिहारमधून बाहेर पडले. शनिवारी सिसोदिया यांनी पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘17 महिन्यांनंतर स्वातंत्र्याचा पहिला चहा घेतोय’ असे ट्विट केले.
जामिनावर मुक्त झाल्यानंतर सिसोदिया शुक्रवारी रात्री आपल्या घरी जाण्यापूर्वी केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे त्यांनी केजरीवाल कुटुंबियांची भेट घेतली. शनिवारी सकाळी त्याने पत्नीसोबत चहा पितानाचा फोटो ‘एक्स’वर शेअर केला. यानंतर 9 वाजण्याच्या सुमारास ते पॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात पोहोचले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राजघाटावर जात त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी आप सरकारचे मंत्रीही त्यांच्यासोबत होते. सिसोदिया 11 वाजण्याच्या सुमारास आप कार्यालयात पोहोचले. नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिसोदिया यांनी भाजपवर अनेक आरोप केले. भाजपला देणगी दिली नाही म्हणून अनेक व्यावसायिकांना तुरुंगात डांबले आहे. मी तुरुंगात असताना या व्यावसायिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे जाणून मला खूप वाईट वाटले. जे कायदे जगभरात दहशतवादी आणि ड्रग माफियांवर लादले जातात तेच कायदे राजकारणी, व्यापारी आणि सर्वसामान्यांवर लादले जात आहेत, असेही सिसोदिया म्हणाले.
आपल्या देशाची कन्या विनेशने जगभरात आपला मान वाढवला आहे. तिने जंतरमंतरवर भाजपच्या एका खासदाराने आम्हाला छेडल्याचा आरोप केला. मात्र, केंद्र सरकार त्या खासदाराला अटकही करत नाही. उलट ती मुलगी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. ही हुकूमशाही नाही तर काय आहे? हे सर्वकाही कोण करतंय हे सर्वांना माहीत असल्याचे पुढे त्यांनी सांगितले.
जनतेच्या अश्र्रूंनीच मला बळ दिले आहे. मला आशा होती की 7-8 महिन्यांत न्याय मिळेल, पण हरकत नाही, 17 महिने गेले. भाजपने खूप प्रयत्न केले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना तुऊंगात टाकले तर आपण सडून जाऊ, असे त्यांना वाटत होते. पण जनतेच्या अश्र्रूंच्या बळावर तुऊंगाचे कुलूप वितळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुरुंग हा अपवाद, जामीन हा नियम : न्यायालय
9 ऑगस्ट रोजी सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या होत्या. कोणालाही गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच खटला न चालवता दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ नये. तुरुंग हा अपवाद आहे आणि जामीन हा नियम आहे हे न्यायालयांनी समजून घेतले पाहिजे. सिसोदिया यांच्या प्रकरणातील खटला लवकर संपण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे त्यांना सध्या जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.