सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत जाऊन उजवीकडे सरकली
किरणोत्सव अखेरच्या दिवशी पूर्ण क्षमतेने
कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव बुधवारी पूर्ण क्षमतेने झाला. किरणोत्सवाला 5.1 वाजता सुरूवात होऊन 4.58 ला सूर्यकिरणे गरूड मंडपाच्या पाठीमागे पोहचली होती. हळूहळू पुढे सरकत सूर्यकिरणांनी 5.48 ला अंबाबाई देवीच्या चेहऱ्याला स्पर्श करून सूर्यकिरणे उजवीकडे सरकत लुप्त झाली. स्वच्छ वातावरणामुळे सूर्यकिरणांच्या अखेरच्या दिवशी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाल्याची माहिती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी दिली.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही. परंतू अखेरच्या दिवशी बुधवारी किरणोत्सवाला 5.1 वाजता चबुतऱ्यापासून किरणोत्सवाला सुरूवात झाली. 4.58 वाजता सूर्यकिरणे गरूड मंडपाच्या पाठीमागे पोहचली होती. 5.26 वाजता गणपती मंदिरच्या पाठीमागे, 5.35 वाजता पितळी उंबऱ्यापर्यंत, 5.39 वाजता संगमरवरी पायरीपर्यंत, 5.41 वाजता अंबाबाईच्या कटांजनापर्यंत सूर्यकिरणे पोहचली. त्यानंतर 5.42 वाजता सूर्यकिरणांनी अंबाबाईचा चरणस्पर्श केला. त्यानंतर 5.47 वाजता सर्यकिरणे खांद्यापर्यंत पोहचली. तर 5.48 वाजता सूर्यकिरणे अंबाबाई देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोहचून उजव्या बाजूला सरकत लुप्त झाली. त्यानंतर अंबाबाई देवीची आरती करून किरणोत्सवाची सांगता करण्यात आली. 2020 व 2022 प्रमाणे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला, अशी माहिती किरणोत्सव अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
यावेळी अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, गजानन नेर्लीकर-देसाई यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवनिर्मित अडथळे काढल्यास सात दिवसाचा किरणोत्सव होईल
सात दिवसाच्या किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत झाला. सात दिवसाच्या अभ्यासानंतर मानवनिर्मित अडथळे काढल्यास वास्तूरचनेप्रमाणे संपूर्ण सात दिवसाचा किरणोत्सव कायमस्वरूपी होवू शकतो.
शिवराज नायकवाडे (सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती)
सात दिवसाचा किरणोत्सव करण्याचा प्रयत्न
करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव सात दिवसाचा करण्यासाठी किरणोत्सव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व विवेकानंद कॉलेज प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने यंदा सात दिवस किरणोत्सवाची पाहणी केली. त्यामुळे यंदा सात दिवसाचा किरणोत्सव झाला आहे.
डॉ. मिलिंद कारंजकर (किरणोत्सव अभ्यासक)