सूर्यकिरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत
कोल्हापूर :
उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाच्या चौथ्या (शनिवारी) दिवशी मावळतीची सूर्यकिरणे करवीर निवासिनी अंबाबाईच्या खांद्यापर्यत गेली आणि डावीकडे लूप्त झाली. उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी सूर्यकिरणे ही अंबाबाईच्या खांद्यापर्यंतच पोहोचतील असे अनुमान बांधलेले असते. त्यानुसार किरणे अंबाबाईच्या खांद्यापर्यंत जाऊन दोन मिनीटे स्थिरावली आणि त्यानंतर लुप्त होऊन गेली.
अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी सूर्यकिरणे आली होती. ही वेळ पकडून चौथ्या दिवसाचा किरणोत्सव सुरु झाल्याचे गृहीत धरले. यावेळी सूर्यकिरणांची तीव्रता 20 हजार 200 लक्स (एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीतून पडणारा प्रकाश हा एक लक्स अशा प्रमाणात मोजला जातो.) इतकी होती. निरभ्र आकाश होते. स्वच्छ वातावरण होते. धुलीकणही कमी होते. त्यामुळे सहाजिकच महाद्वारावर आलेल्या सूर्यकिरणांची तिव्रता मोठी राहिली. यानंतर पुढील 36 मिनिटात गऊड मंडपातील देवीची सदर, अंबाबाई मंदिरातील गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा असा प्रवास करत सूर्यकिरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यात गेली. यावेळी किरणांची तिव्रता निच्चांकी 38 लक्स इतकी होऊन गेली होती. 6 वाजून 11 मिनीटांनी सूर्यकिरणांनी अंबाबाई ज्या चांदीच्या कटांजनावर उभी आहे, त्यावर पोहोचली. यावेळी मात्र किरणांची तिव्रता 38 वरून 84.7 लक्स होऊन गेलीच शिवाय पुढील एक मिनीटात सूर्यकिरणांनी अंबाबाईचे चरण स्पर्शही केले. यानंतर किरणे गुडघा, कमर असा प्रवास करत 6 वाजून 16 मिनिटांनी खांद्यावर गेली. 6 वाजून 18 मिनिटांपर्यंत किरणे खांद्यावरच स्थिरावली होती. यानंतर मात्र किरणे अचानक डावीकडे लुप्त होऊन गेली आणि चौथ्या दिवसाच्या किरणोत्सवाची सांगता झाली.