सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांपर्यंतच
गेली ५ दिवस सुरू राहिलेल्या किरणोत्सवाची सांगता
चार मिनिटे सुर्यकिरणे स्थिरावली
कोल्हापूर
गेली ५ दिवस भाविकांमध्ये औत्सुक्याचा विषय बनलेल्या अंबाबाईच्या किरणोत्सवाची रविवारी सांगता झाली. अखेरच्या पाचव्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे फक्त अंबाबाईच्या चरणांपर्यंत जाऊन डावीकडे लुप्त झाली. दुपारनंतर आकाशात तयार झालेले ढगाळ वातावरण रात्रीपर्यंत कायम होते. तसेच रविवारच्या सुट्टीचे औचित्य परगावाहून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे अंबाबाई मंदिरातील आद्रतेचे प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत गेले होते. हवेत धुलीकणही वाढले होते. त्यामुळे अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत गेलेल्या सूर्यकिरणांचा प्रवास विस्कळीत झाला. सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी सूर्यकिरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर आल्याचे पाहून अखेरच्या पाचव्या दिवसाचा किरणोत्सव सुरु झाल्याचे गृहीत धरले. ढगाळ वातावरण व आद्रता यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता गेल्या चार दिवसांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटून ४ हजार १० लक्स (एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीतून पडणारा प्रकाश हा एक लक्स अशा प्रमाणात मोजला जातो.) इतकी झाली होती. यानंतर पुढील ४४ मिनिटात गरूड मंडपातील देवीची सदर, अंबाबाई मंदिरातील गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा, अंबाबाईच्या गाभाऱ्याचा चांदीचा उंबरठा असा प्रवास करत सूर्यकिरणे अंबाबाई ज्या चांदीच्या कटांजनावर उभी आहे, त्यावर पोहोचली. यावेळी किरणांची तिव्रता केवळ ३.५ लक्स इतकी निच्चांकी झाली होती. बरोबर ६ वाजून १३ मिनिटांनी सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांपर्यंत पोहोचली. पुढील चार मिनिटे किरणे चरणावरच स्थिरावली. त्यानंतर मात्र किरणे डावीकडे लुप्त झाली आणि किरणोत्सवाची सांगता झाली.