पूरब से सूर्य उगा
पूरब से सूर्य उगा फैला उजियारा
जागी सब दिशा दिशा जागा जग सारा
या गाण्याच्या वाहत्या सुरांसोबत सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्या कीर्तीचा सुगंधही लहरत येतो. नव्वदच्या दशकातील खूप गाजलेली ही जिंगल. राष्ट्रीय साक्षरता अभियान अंतर्गत घडलेलं हे गीत. शिक्षणाने भविष्य उज्ज्वल घडवूया. सुमार्ग धरूया हे सांगणारं हे गीत. मानवी जीवनाचा सतत सुरू असणारा प्रवास हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. एक साधा विचार करून पहा. आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आणि ठिकठिकाणी सूर्योदय होत जातो. म्हणून एखादा देश हा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो तर काही साम्राज्यं एकेकाळी अशी होती की ज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही असं म्हटलं जायचं. वास्तविक सूर्याला ग्रहमालेतला ग्रह म्हणून स्थान ज्योतिषांनी दिलेलं असलं, तरी खरं तर तो आहे एक तारा. एक असा तारा की जो आपल्याला साध्या डोळ्यांनी सहज दिसतो. किंबहुना ज्याच्यामुळेच दिसणं ही प्रक्रिया घडते. दर 24 तासांनी आपल्याला एक नवीन ताजा दिवस अनुभवायला मिळतो. कदाचित म्हणूनच आपल्याला दिवसाची आणि रोजच्या सूर्योदयाची किंमत नसते. पण कुतूहलाच्या नजरेने पाहिलं किंवा लहानग्या बाळाच्या नजरेने पाहिलं तर रोजच सूर्योदय नवा आहे हे नक्की ध्यानात येईल आपल्या. सूर्याची किंमत, सूर्याच्या किरणांपासून मिळणारा त्या उबेतला गोडवा धृवीय प्रदेशातल्या लोकांना विचारा. जिथे सहा सहा महिने दिवस उजाडतच नाही. घाण्याला बांधलेल्या बैलासारखे सहा महिने रात्रीच्या खुंटाभोवती फिरत राहायचं. हे ज्यांना भोगावं लागतं, ढीगभर बर्फात गाडून घेऊनच यांचे दिवसावर दिवस सरत जातात. ज्यांचं अर्धं आयुष्य मरणासन्न गारठ्यात जातं त्यांनाच सूर्योदयाची किंमत कळावी.
अस्सल आणि सश्रद्ध भारतीय माणसाची सकाळ ही सूर्याच्या अगोदर सुरू होते. सूर्य पूर्वेला दिसू लागायच्या अगोदरच पूर्वीची लोकं शुचिर्भूत होत असत आणि सूर्याला अर्घ्य देण्यात येत असे. त्या प्रथेचा प्रभाव इतका होता की ‘कट्यार काळजात घुसली’ मधलं
तेजो निधी लोहगोल
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भुवन आज
हे ललितभटियार रागातील एक ताकदवान नाट्यागीत आजही तयारीने पेश केलं गेलं की सौर सूक्त म्हणजे काय हे आपोआप लक्षात येऊ लागते. अंतर्बाह्य स्वच्छ होऊन, उगवत्या सूर्याकडे ओंजळ धरून त्या ओंजळीत घेतलेलं पाणी हळुवारपणे सूर्याच्या दिशेने अर्पण करणे ही प्रथाच मुळी किती अर्थपूर्ण आणि सुंदर आहे! आपल्या संस्कृतीची अशी छोटी छोटी प्रतीकं प्रत्येक काळात माणसाच्या मनात पेरली गेलेली आहेत. म्हणून इतकी परकीय आक्रमणं होऊनही आणि आपल्या संस्कृतीची शकलं करण्याचा सतत प्रयत्न होऊनही ती आजही जिवंत आहे. गाण्यांमधून वाहते आहे. कथांमधून वाहते आहे हाच तो ज्ञानसूर्याचा प्रकाश! ब्राह्म मुहूर्तावर आकाश मार्गाने चांगल्या शक्तींचा संचार सुरू असतो. त्या वेळेवर, सूर्योदयापर्यंत आणि त्यानंतरही काही काळ वातावरणात सात्विक वृत्तीची चांगली स्पंदने भरून राहिलेली असतात असं म्हणतात. हीच स्पंदने गाण्यांमध्ये अचूक पकडून आपल्या पूर्वसूरींनी विशिष्ट वेळी गायले जाणारे राग घडवले असावेत. म्हणूनच असलेले भैरव किंवा तोडी यासारखे राग त्यावेळी म्हणजेच पहाटे किंवा सकाळी ऐकणं हे अपूर्व असतं. बिभास रागातली अशीच एक चीज अत्यंत सुंदर आहे
तारवा गिनत गिनत मैं तो रैन गवाई
ऐसी प्रीत तुम कबहु ना कीनी
सूरजवा बलमा प्यारे
जीव नुसता झुलत राहतो त्या रिषभावर! कासावीस व्हायला होतं. तेव्हा कळतं येणाऱ्या सूर्योदयाची वाट बघण्यात कशी कसोटी लागते! इथे प्रिय व्यक्तीला सूर्याची उपमा दिलेली आहे. तुझी भेट व्हावी म्हणून तारे मोजत मोजत मी पूर्ण रात्र जागून काढली असं ती प्रेयसी म्हणते. पारिजात ही पूर्वी एक राजकुमारी होती. तिनं सूर्यावर प्रेम केलं. आणि रोज पहाटे सूर्योदय अगोदर ती स्वत:ला सूर्यावरून जणू ओवाळून टाकते. किंवा रात्रीचे तिच्या अंगाखांद्यावर फुललेले तारे सूर्याच्या पायावर वाहून ती स्वत:ला समर्पित करते. म्हणून तर पूर्व दिशेला अरुण रथावर या गीतात
अरुण उषेच्या मीलनकालीं
प्राजक्ताच्या झाडाखाली
फुले वेचली भरून ओंजळी
गुंफिन प्रभुला माळ मनोहर
ही फुलं प्राजक्ताचीच निवडली आहेत. कारण ती सूर्योदयाच्या वेळेस जमिनीवर पडतात त्यांचं आयुष्य तेवढंच असतं.
पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीस येसी सारा जागवीत गाव
पुष्प पत्र दानाची रे तुला नसे आस
तूच चालुनीया येसी माझिया घरास
भक्तांलागी गुंतलासे तुझा भक्तिभाव
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या आकाशवाणीवर दररोज सकाळी वाजणारं हे अप्रतिम गीत गायलंय पंडित रामदास कामत यांनी. गीताचे बोल खरोखर इतके सुरेख आहेत! दिवसा दिसणाऱ्या, प्रत्यक्ष रोज रोज भेटणाऱ्या देवाला सूर्यदेव म्हणतात. त्याला परमेश्वरी तेजाचं प्रतिरूप म्हटलं जातं. आणि खरोखरच हा देव स्वत: होऊन आपल्या घरापर्यंत चालत येतो. त्याला ना तुमच्याकडून पूजा अपेक्षित असते ना नैवैद्य. तुम्ही त्याला अर्घ्य द्या किंवा देऊ नका. तो हसत हसत सहस्त्रकिरणांचे बाहू तुमच्यापर्यंत पोहोचवत आपलं रोजचं जगणं उजळत उभा असतो.
रोके से ना रुके हम, मर्जीसे चलें हम
बादल सा गरजें हम, सावन सा बरसे हम
सूरज सा चमके हम - स्कूल चलें हम
स्कूल चले हम.. शिक्षणाच्या अभियानांतर्गत असलेलं अतिशय लोकप्रिय गीत. हेही नव्वदच्या दशकातीलच. त्यामध्येही सूर्याची उपमा ओघानेच येते. सकाळी सकाळीच कुणी जवळचा तर कोणी लांबवरचा प्रवास करत शाळेत निघालेली मुलं! सूर्य जसा माणसाचा दिवस उजळून टाकतो, त्याचप्रमाणे आम्हाला आमचं आयुष्य उजळून टाकायचं आहे. म्हणून आम्ही सूर्यासारखे चमकू. शिक्षणाने, ज्ञानाने मोठे होऊ आणि चला चला दोस्तांनो आपण सगळे मिळून शाळेला जाऊ असं म्हणून शाळेला जायला आळस करणाऱ्या प्रत्येक मुलाला शाळेत जायला उद्युक्त करणारं हे गाणं आजही 40 च्या पुढे असलेल्या लोकांच्या मनात बसलेलं आहे.
रोजचा सूर्योदय आपल्याला नवा वाटत नसला तरी आपणा सर्वांसाठीच आजचा सूर्योदय नक्कीच नवा आहे. कारण त्याचं वैशिष्ट्या असं आहे की आजच्या सूर्योदयाने एक वर्ष पाठी पडलेलं आहे आजच्या सूर्योदयाने आपल्याला 2025 साल दाखवलेलं आहे. कालच्या सूर्याला ‘मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडूनी दोन्ही करा’ असं म्हणत आठवणींचे त्याला दिलेलं अर्घ्य आणि त्याचे मानलेले आभार मनाच्या मागल्या दारी तेवत ठेवून आज आपण नववर्षाचे स्वागत करतो आहोत. या नववर्षात सूर्यासारखंच तेजाने उजळून जाण्याचा संकल्प आपण सर्वांनी मनोमन सोडूया. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु