For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उगवला नारायण

06:40 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
उगवला नारायण
Advertisement

सूर्य हा जगाचा आत्मा आहे. सूर्याची उत्पत्ती ही विराट पुरुषाच्या नेत्रांपासून झाली आहे. माणसाच्या चर्मचक्षूंना दिसणारा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे सूर्य. श्री दत्तमहात्म्य या ग्रंथात प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात, सूर्यनारायण ग्रीष्म ऋतूमध्ये पृथ्वीवरचे सर्व पाणी आपल्या किरणांनी शोषून घेतात आणि पुढे वर्षा ऋतूमध्ये ते सर्व पाणी पृथ्वीला परत देऊन टाकतात. स्वत:जवळ काहीही शिल्लक ठेवीत नाहीत. माणसानेही असेच करावे. उपयुक्त दिसेल ते सर्व ग्रहण करावे परंतु त्यात आसक्त होऊ नये. योग्यवेळी, योग्य पात्री ते दान करावे.

Advertisement

वेदना, दु:ख, काळजी, चिंता यांचे नाते रात्रीशी घट्ट चिकटलेले असते. रात्र जागून काढताना यांचा क्षणभरही वियोग होत नाही. रात्री सारे भयाण वाटते. रात्रीचा मिट्ट काळोख अंगावर येतो आणि चिंताग्रस्त माणसे उजाडायची आतुरतेने वाट बघतात. प्रवासातले संकट असो वा इस्पितळात उपचार घेणारे जिवलग, याचा अनुभव घेत असतात. पहाटे सूर्योदयापूर्वी होणारे उषादर्शन म्हणूनच मन उजळवून टाकते. ‘उषा’ ही एक वैदिक देवता आहे. ऋग्वेदामध्ये उषेचे वर्णन करणारी वीस सुत्ते आहेत. ध्रुव प्रदेशात दीर्घरात्रीनंतर उष:काल होतो आणि तो दीर्घ मुदतीचा असतो. त्यानंतर सूर्योदय होतो म्हणून उषेला विशेष वंदन केले आहे. कुठे उषेला सूर्याची पत्नी, तर कुठे माता असे म्हटले आहे. उषा सूर्याला येण्याचा मार्ग मोकळा करते. ती यज्ञ, अग्नी यांची जननी आहे. तिने मातेप्रमाणे आपल्यावर प्रेम करावे अशी ऋग्वेदामध्ये प्रार्थना आहे. काळोख संपवणारी उषा म्हणजे ज्योती आहे. ती मनामनांमध्ये प्रकाश पसरवते आणि अंध:कार दूर करते.

उजेड पडला की मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. सूर्याची उत्पत्ती ही विराट पुरुषाच्या नेत्रांपासून झाली आहे. माणसाच्या चर्मचक्षूंना दिसणारा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे सूर्य. श्री दत्तमहात्म्य या ग्रंथात प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात, सूर्यनारायण ग्रीष्म ऋतूमध्ये पृथ्वीवरचे सर्व पाणी आपल्या किरणांनी शोषून घेतात आणि पुढे वर्षा ऋतूमध्ये ते सर्व पाणी पृथ्वीला परत देऊन टाकतात. स्वत:जवळ काहीही शिल्लक ठेवीत नाहीत. माणसानेही असेच करावे. उपयुक्त दिसेल ते सर्व ग्रहण करावे परंतु त्यात आसक्त होऊ नये. योग्यवेळी, योग्य पात्री ते दान करावे. अवधूत सूर्यापासून ही महत्त्वाची गोष्ट शिकले. सूर्य हा माणसाचा मित्र आहे. हा माणसाला पापापासून दूर करतो. एका लोकप्रिय गीतामध्ये असे म्हटले आहे की ‘उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप.’ पू. पांडुरंगशास्त्राr आठवले म्हणतात, ‘सूर्य हा भगवंताचा डोळा असल्यामुळे तो माणसाचा सर्व जीवनव्यवहार पाहतो. त्यामुळे माणूस पाप करताना दहादा विचार करतो. सूर्य हा महान कर्मयोगी असल्यामुळे तो माणसाला कार्यप्रवृत्त करतो.’

Advertisement

सूर्य हा समस्त स्थावर जंगमाचा आत्मा आहे. त्याचा मान हा राखलाच पाहिजे म्हणून तो येण्यापूर्वी स्नान करून त्याच्या स्वागताला तयार रहा, असा पूर्वजांनी संदेश दिला. पू. डोंगरे महाराज म्हणत की सूर्याच्या उपासनेने बुद्धी उज्वल होत असते. त्याची उपासना करा. सूर्य उगवलाच नाही तर पृथ्वीवर प्रलय होईल. सूर्याचे मानवावर असीम उपकार आहेत. सूर्याने जर विद्युतखात्यासारखे बिल पाठवले तर ते माणसाला भरता येईल का? सूर्य तर रविवारची सुट्टीही घेत नाही. ज्या दिवशी तो सुट्टी घेईल, त्या दिवशी काय होईल? माणसे बुद्धिमान खरी; परंतु पशुपक्ष्यांमध्ये एक गुण माणसांपेक्षाही अधिक आहे. तो म्हणजे सगळी पक्षीसृष्टी सूर्योदयापूर्वीच उठते. सूर्याची माणसाला शिकवण आहे की मर्यादांचे उल्लंघन करू नका.

भारतीय संस्कृतीकोशामध्ये असे म्हटले आहे की पुण्यवान आत्मे सूर्यबिंबात राहतात. याचे उदाहरण म्हणून ते सत्यवान-सावित्रीची कथा देतात. यमधर्म हा सूर्याचा पुत्र आहे. तो प्राणाचे नियमन करतो. सूर्याचा आविष्कार म्हणजेच यम. त्याचे पाश म्हणजे सूर्यकिरण. यमाने सत्यवानाचे प्राण सूर्यपाशांनी ग्रहण केले तेव्हा सूर्याची शक्ती असलेल्या सावित्रीने त्याला यमपाशातून सोडवले. सावित्री ही सवितृ या सूर्याच्या सर्जनकर्त्या रूपाची शक्ती आहे. सूर्याची उपासना केल्यावर ती अश्वपती राजाची कन्या म्हणून पृथ्वीवरती अवतीर्ण झाली.

समस्त मानवाला ज्याचा धाक आणि भीती आहे तो शनी ग्रह हा सूर्यपुत्र आहे. परंतु सूर्याचे कोणतेही गुण शनीमध्ये नाहीत आणि पिता-पुत्र यांचे सख्य देखील नाही, असे जाणकार म्हणतात. शनिदेव जन्माला येताच त्यांची दृष्टी सूर्याचा सारथी अरुण याच्यावर पडली आणि त्याचे हातपाय गळून पडले. श्री सूर्यस्तुतीचे पहिले कडवे असे आहे, ‘जयाच्या रथा एकची चक्र पाही । नसे भूमी आकाश आधार काही । असे सारथी पांगुळा ज्या रथासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी?’ सूर्यनारायणाला सकाळ, संध्याकाळ नमस्कार करावा आणि कृतज्ञ राहावे असे भारतीय संस्कृती सांगते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘सकळ दोषांचा परिहार । करिता सूर्यास नमस्कार । स्फूर्ती वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेता?’ अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा निरोप असतो की माणसाने सत्कर्म करावे.

श्रीराम हे सूर्यवंशात जन्माला आले. श्रीरामायणाच्या युद्धकांडात आदित्यहृदय हे स्तोत्र समाविष्ट आहे. श्रीरामांना भेटण्यासाठी राम-रावण युद्धस्थळी अगस्ती ऋषी आले असता त्यांनी श्रीरामांना तेज प्राप्त व्हावे व रावणाचे तेज हरण व्हावे यासाठी आदित्यहृदय स्तोत्र श्रीरामांना सांगितले. सूर्याची प्रार्थना करून स्तोत्राचा विधी कसा करायचा हे समजावून सांगितले. हे स्तोत्र शत्रूंचा विनाश करणारे आहे. यात म्हटले आहे की एखाद्या संकटात, कष्टात, जंगलात आणि मनात भय निर्माण झाले असता जो या सूर्यनामाचे गान करतो त्याला कधीही दु:ख भोगावे लागत नाही. यात अनेक सूर्यनामे आहेत. आदित्य हे एक लोकप्रिय नाम आहे. याचा अर्थ, वर्षाच्या बारा महिन्यात सूर्य ज्या प्रकारच्या किरणांनी प्रकाश देतो त्याला ‘आदित्य’ असे नाव आहे. सूर्य अपापती म्हणजे पाण्याचा स्वामी आहे. त्याचे एक नाव मृत्यू असेही आहे. प्राणीमात्रातील आपले अस्तित्व तो काढून घेतो. तो रवी आहे. म्हणजे सहस्र गुणांनी रसांचा गुण वाढवणारा आहे. घुसळण्याच्या रवीला सूर्याचे नाव आहे म्हणून पूर्वी सूर्यास्तानंतर बायका ताक करीत नसत.

महामुनी याज्ञवल्क्य ऋषींनी रचलेले सूर्यकवच आहे. याज्ञवल्क्य यांचे गुरू सूर्यदेव होते. सूर्याने आपले सर्व वैभव या आपल्या शिष्याला दिले. सूर्याने याज्ञवल्क्य ऋषींना वेद शिकवला. या वेदाचा अभ्यास करीत असताना ते सूर्याच्या रथावर बसत असत. त्यांनी रचलेले सूर्यमंत्र कवच फार प्रभावी आहे. यात ते म्हणतात, ‘जिव्हां मे मानद: पातु । कंठं मे सुरवंदित:।’ सूर्य तेजाशिवाय वाचा संभवत नाही. ढगाळ वातावरणात बरेचदा घसा बसतो. सूर्यामुळे वाचेला प्रभाव प्राप्त होतो आणि ती विस्तार पावते.

सूर्य हा समस्त सृष्टीचा अन्नदाता आहे. त्याला वंदन करताना ‘रुचये नम?’ असे म्हणतात. सूर्य प्रत्येक पदार्थांमध्ये आरोग्याला उपयुक्त अशी रुची निर्माण करतो. प्राचीन काळातील स्त्रियांनी सूर्यावर अनेक लोकगीते व ओव्या रचल्या. त्यांनी सूर्याला देव मानण्यापेक्षा आपल्या माहेरचा, जिव्हाळ्याचा, वात्सल्याचा बंधू किंवा पुत्र अशा नात्यांनी बांधले आहे. एक ओवी तर अशी आहे, ‘उगवलं नारायेन, थांबा वं माझ्या दारी, धहीभाताची देते न्हयारी, मग पिरथमी धुंडा सारी.’ सूर्य तिचा भाऊ आहे. ती म्हणते, ‘तू माझ्या दारी थांब. दहिभाताची न्याहारी कर आणि मग खुशाल पृथ्वी धुंडाळायला निघ.’ हा जिव्हाळा, ही भक्ती म्हणजे एक प्रकारचे सूर्यस्तोत्रच आहे. सूर्याला ‘हरये नम:’ असे म्हणतात. याचा अर्थ ‘सूर्यदेवा, आमचे लक्ष प्रभुचरणी लावण्याचे सामर्थ्य आम्हास दे. आम्ही तुला नमस्कार करतो’.

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.