For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Women Construction Workers | उंच इमारती उभ्या करणाऱ्या कष्टकरी महिलांचा संघर्ष

11:29 AM Mar 10, 2026 IST | NEETA POTDAR
women construction workers   उंच इमारती उभ्या करणाऱ्या कष्टकरी महिलांचा संघर्ष
Advertisement

                                कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगार,

Advertisement

by नीता पोतदार

कोल्हापूर : ८ मार्चला जगभर महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या प्रगतीच्या, त्यांच्या यशाच्या आणि सबलीकरणाच्या अनेक कथा या दिवशी सांगितल्या जातात. शिक्षण, उद्योग, विज्ञान आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी मोठी झेप घेतली आहे. मात्र या प्रगतीच्या चित्राच्या मागे अजूनही काही महिला अशा आहेत, ज्यांचं आयुष्य रोजच्या कष्टात आणि संघर्षातच जात आहे. शहरात उभ्या राहणाऱ्या उंच इमारतींच्या मागे काम करणाऱ्या महिला बांधकाम कामगारांची कहाणी ही अशाच संघर्षाची आहे.

Advertisement

कोल्हापुरातील अनेक बांधकाम साईटवर सकाळपासून महिलांची धावपळ सुरू झालेली दिसते. डोक्यावर वीट, वाळू आणि सिमेंटचे घमेले उचलत त्या दिवसभर कष्ट करत असतात. उन्हाचा तडाखा असो किंवा धुळीचा मारा, या महिलांचं काम मात्र थांबत नाही. उंच इमारतींच्या बांधकामात पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून त्या काम करताना दिसतात.

कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. उपलब्ध नोंदीनुसार जिल्ह्यात अंदाजे दीड लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी तब्बल ७८ हजार ५८५ महिला कामगार बांधकाम साईटवर काम करत आहेत. शहरात मोठमोठ्या इमारती बांधण्यामध्ये या महिलांचा मोठा वाटा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

या महिलांपैकी अनेक जणी परराज्यातून कामाच्या शोधात कोल्हापुरात आल्या आहेत. कुणी झारखंडची, कुणी बिहारची, तर कुणी छत्तीसगडची....स्वतःचं गाव आणि आपली माणसं मागे ठेवून त्या रोजंदारीवर काम करत आहेत. आयुष्यात शिक्षणाची संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या मनात एकच इच्छा आहे आपल्या मुलांना शिक्षण देऊन मोठं करायचं.

घर चालवण्यासाठी आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी या महिला रोज तासानतास मेहनत करत असतात. दिवसभराच्या कष्टानंतर थकवा जाणवत असला, तरी मुलांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्या पुन्हा कामाला लागतात.

रोजंदारीवर काम असल्यामुळे सुट्टी घेणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. एक दिवस कामावर गेल्या नाहीत, तर त्या दिवसाचे पैसे कमी होतात. त्यामुळे तब्येत बरी नसतानाही अनेक महिला कामावर येतात.

बांधकाम साईटवर आणखी एक वेगळं चित्रही पाहायला मिळतं. काही महिलांची लहान मुलंही त्यांच्या सोबत साईटवर असतात. आई काम करत असताना ही मुलं कधी वाळूत खेळताना, तर कधी बाजूला बसून मोबाईल पाहताना दिसतात. एका बाजूला आई डोक्यावर वीट उचलत इमारत बांधत असते आणि दुसऱ्या बाजूला तिचं छोटं मूल त्या धुळीतच आपलं बालपण घालवत असतं.

महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या प्रगतीबद्दल मोठ्या चर्चा केल्या जातात. मात्र शहराच्या विकासात मोठा वाटा उचलणाऱ्या या कष्टकरी महिलांचा संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे.....

परिस्थितीमुळे माझं शिक्षण पूर्ण झालं नाही, पण मला माझ्या मुलांना शिकवून मोठं करायचं आहे. — जयंती केमर, बांधकाम महिला कामगार

काम नाही केलं तर घर कसं चालणार? आजारी पडलो तरी औषध घेतो, पण सुट्टी घेत नाही.— अंबरीकाबाई, बांधकाम महिला कामगार

कोल्हापूर जिल्ह्यातील महिला कामगार मोठ्या प्रमाणात कष्टाची कामे करतात. शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना आरोग्य, विमा आणि आर्थिक सहाय्य दिले जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच समान वेतन मिळण्यासाठी सुद्धा शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. — धीरज जाधव, सरकारी कामगार अधिकारी

Advertisement
Tags :

.