महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नक्कल प्रकरणाचे तीव्र पडसाद; विरोधकांकडून ‘मिमिक्री’चे समर्थन, पंतप्रधान मोदींकडून सहानुभूती

11:59 PM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धनखड यांच्या अवमाननेमुळे राष्ट्रपतीही व्यथित 

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची भ्रष्ट नक्कल केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. ही नक्कल किंवा मिमिक्री तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मंगळवारी संसद सदनाबाहेर केली होती. धनखड यांच्यासारखेच हावभाव करुन बॅनर्जी यांनी सर्वसामान्य लोकांचाही राग ओढवून घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रकारासंबंधी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करुन आपण व्यथित झालो असल्याचे स्पष्ट केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना दूरध्वनी करून सहानुभूती व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एक्स’ संदेश करुन या प्रकारासंबंधी संताप व्यक्त केला. संसदेच्या परिसरात आमच्या माननीय उपराष्ट्रपतींना ज्या प्रकारे अपमानित करण्यात आले, ती कृती निंदनीय आहे. मी अत्यंत व्यथित झाले आहे. लोकप्रतिनिधींना आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र व्यक्तीस्वातंत्र्याच्याही मर्यादा असतात ही बाब त्यांनी जाणली पाहिजे,’ अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या आहेत. सोशल मिडियावरही प्रक्षोभ उसळला आहे.

भाजप खासदारांची स्वयंशिक्षा

उपराष्ट्रपतींच्या विरोधकांनी केलेल्या अपमानाला भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी आत्मक्लेष करुन घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या राज्यसभेतील सर्व खासदारांनी बुधवारी एक तासभर उभे राहून स्वत:ला ‘शिक्षा’ करुन घेतली. देव विरोधकांना चांगली बुद्धी देईल, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय प्रकार घडला?

राज्यसभेत विरोधकांनी संसद सुरक्षेच्या निमित्ताने प्रचंड गोंधळ घातल्याने कामकाज चालविणे अशक्य झाले होते. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष धनखड यांनी पन्नासहून अधिक खासदारांना अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित केले आहे. यामुळे चिडलेल्या विरोधकांनी मंगळवारी संसदसदनाच्या बाहेर ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन केले होते. त्यात कल्याण बॅनर्जी यांनी धनखड यांची भ्रष्ट नक्कल केली. राहुल गांधी यांनी याचे व्हिडीओ चित्रण केले. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

विरोधकांकडून समर्थन

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकाराचे समर्थन केले. मिमिक्री ही एक कला आहे. तिचे प्रदर्शन करणे गैर नाही, असे कल्याण बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. तर ममता बॅनर्जी यांनी हा प्रकार काही इतका गंभीर नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अन्य विरोधी नेत्यांनीही या प्रकाराचा बाऊ केला जात असल्याचे मत व्यक्त केले.

भाजपची कडाडून टीका

भारतीय जनता पक्षाने विरोधकांच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त करत, हे विकृत मानसिकतेचे लक्षण असल्याची टीका केली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती इत्यादी उच्च पदे देशाच्या प्रतिष्ठेचे मानबिंदू असतात. त्यांचा साधा उल्लेखही आदरपूर्वक करावा लागतो. असा प्रघात असताना जाहीररित्या त्यांची चेष्टा करणे हे हीन वृत्तीचे प्रदर्शन आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली.

माझे कर्तव्य करतच राहणार

कोणीही कितीही चेष्टा केली किंवा अवमान केला तरी आपण आपले कर्तव्य करीतच राहू, अशी स्पष्टोक्ती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केली आहे. राज्यसभा ही गोंधळासाठी नसून कामकाज करण्यासाठी आहे. तेथे शिस्तपालन करणे आवश्यक आहे. जे असे करणार नाहीत, त्यांना नियमांच्या चौकटीत राहून धडा देण्याचा आपल्याला अधिकार आहे. ते कर्तव्य कोणत्याही परिस्थितीत पार पाडले जाईल, असा संदेश त्यांनी सर्व विरोधी पक्षांना दिला आहे.

जातीचा मुद्दाही उपस्थित

जगदीप धनखड हे जाट समुदायातील आहेत. त्यांची अशी मस्करी केल्यामुळे त्या समाजातही संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. जर हा प्रकार करणाऱ्यांनी क्षमायाचना केली नाही, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अशा पक्षांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा जाट समुदायाच्या अनेक ज्येष्ठांनी दिला.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून सहानुभूती

‘विरोधी पक्षांचे हे वर्तन अश्लाघ्य आणि असमर्थनीय आहे. गेली 21 वर्षे मी स्वत: माझ्या विरोधातील अशीच अपमानास्पद वर्तणूक झेलली आहे. आपल्या वाट्याला आज हा अपमान आपण कर्तव्याची चोखपणे पूर्ती करीत आहात म्हणून येत आहे. पण आपल्याला आपली विहित आणि हितकारक कर्तव्ये पार पाडावीच लागतात,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनी करुन जगदीप धनखड यांना सहानुभूती दिली. धनखड यांनी स्वत:च ही माहिती दिली आहे.

वाद-प्रतिवाद

ड उपराष्ट्रपतींची नक्कल करणे विरोधकांना चांगलेच भोवण्याची शक्यता

ड विरोधकांकडून कृतीचे समर्थन, प्रकार फारसा गंभीर नसल्याचा दावा

ड मान्यवरांसह सर्वसामान्यांकडूनही संतप्त प्रतिक्रिया, कारवाईची मागणी

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#Political#social media
Next Article