For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

06:44 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
Advertisement

मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ : संपावर तोडगा काढण्यात शिंदे सरकार यशस्वी

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. त्यांची बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. यात कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने त्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ केली आहे.

Advertisement

संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगफह येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ होते. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या उपस्थित होत्या. कर्मचाऱ्यांनी 5000 रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवार मध्यरात्रीपासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरतीचा निर्णय बुधवारी घेतला होता. कारण गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठीच हेळसांड किंवा खोळंबा होण्याची शक्यता होती.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपती विशेष गाड्यांची वाहतूक सुऊ झाली आहे. एसटी कामगारांनी आधी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे सरकारला जाग येईल आणि एसटी कामगारांच्या हिताचा निर्णय होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मंगळवारी झालेली एसटी कामगार संयुक्त कृती समितीबरोबरची बैठक निष्फळ ठरली आणि एसटी कामगार कृती समितीने मंगळवार मध्यरात्रीपासून संपाचा निर्णय घेतला.

ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे कामगार संपावर गेल्याने गणपती जादा वाहतूक अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. संपाची व्याप्ती वाढत होती. त्यामुळे एसटी प्रशासनाने कंत्राटी चालक भरतीचा मोठा निर्णय घेतला होता. बुधवारी दुपारी 12 पर्यंत एसटीच्या राज्यभरातील 251 आगारापैकी 96 आगार पूर्णत: बंद होते. 82 आगार अंशत: सुरू होते. तर 73 आगारातील वाहतूक सुरळीत होती. आगाऊ आरक्षण करूनही गणपतीच्या सणाला जर आरक्षित प्रवाशांना बसेस उपलब्ध झाल्या नाहीत किंवा बस चालकांअभावी गाड्या सुटल्या नाहीत तर एसटीच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे एसटी महामंडळाने गणपती सणाच्या जादा वाहतुकीला अडचण येऊ नये करार पद्धतीने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 4200 ग्रुप आरक्षणासह एकूण 4953 जादा बसेस फुल्ल झाल्या आहेत. मुंबईतून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement
Tags :

.