एकजुटीचे बळ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी पेपरफुटीसह आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला तूर्तास विराम मिळाला आहे. पेपरफुटीच्या तपासासाठी नेमण्यात आलेला चौकशी आयोग, त्यावरील तुकाराम मुंढे यांची नियुक्ती आणि एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांची रजेवर जाण्याची घोषणा या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. विद्यार्थी एकजुटीचेच हे बळ म्हणावे लागेल.
पेपरफुटी, परीक्षांमधील गोंधळ, गैरप्रकार व परीक्षा पुढे ढकलण्याच्या प्रकारांमुळे सध्या राज्यासह देशभरातील विद्यार्थीमन अस्वस्थ आहे. नीट पेपरफुटीप्रकरणात राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा झालेला स्फोट व त्यातून शिक्षणमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा, हे उदाहरण ताजेच. मागच्या काही दिवसांपासून एमपीएससी परीक्षांमध्येही असाच गोंधळ सुरू असल्याचे सातत्याने पहायला मिळाले. कधी पेपर फुटले, गडबड झाली, तर कधी पेपर पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागला. त्यातूनच पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे अलीकडच्या काळातील सर्वांत मोठे आंदोलन उभे राहिले. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सांगली, सातारा कोल्हापूरपासून राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसले. खरेतर एमीपीएससीची तयारी करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी लक्षणीय प्रमाणात असतात. हाडाची काडे करून पालक विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरामध्ये पाठवतात. मेस, अभ्यासिकेचा खर्च उचलतात. मर्यादित जागा असल्या, तरी विद्यार्थीही सर्वस्व पणाला लावून अभ्यास करतात. कारण मनात केवळ अधिकारी व्हायचे लक्ष्य असते. परंतु, मागील काही वर्षांमध्ये पेपरफुटी वा तत्सम गैरप्रकारांमुळे कित्येक विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. त्यातून काही विद्यार्थी नैराश्याचे बळी ठरले. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी उपसलेले आंदोलनाचे हत्यार स्वाभाविकच म्हणावे लागेल. मागील जवळपास दहा दिवसांपासून एस. एम. जोशी पूल परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून पेपरफुटीच्या तपासासह आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. अनेक नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनीही आंदोलनस्थळी भेट देत या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आंदोलनाचे बळ वाढत गेले. खरेतर विद्यार्थी हा या आंदोलनाचा केंद्रबिंदू. गांधीजयंतीपासून सत्याग्रहाचे हत्यार उपसणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी कुठेही आपला निर्धार ढळू दिला नाही. मुळात कोणत्याही आंदोलनाच्या यशस्वितेकरिता त्याची वैचारिक बैठक पक्की असावी लागते. या आंदोलनाची वैचारिक बैठक कशी आणि काय आहे, हे विवेकानंद पाटील यांच्यासारख्या विद्यार्थी मित्रांनी दाखवून दिले. वास्तविक, देशाला अनेक हिरे अशा प्रकारच्या आंदोलनातूनच मिळाले आहेत. म्हणूनच विवेकी विवेकानंद पाटील यांच्याकडूनही बऱ्याच अपेक्षा असतील. एखादे आंदोलन सुरू करणे सोपे असते. परंतु, ते चालवणे आणि योग्य वेळी थांबवणे, यात नेतृत्वाचा कस असतो. रोहित पवार यांनी यामध्ये दाखवलेल्या तारतम्याने त्यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने उजळलेले दिसते. याचा आगामी राजकीय वाटचालीकरिता निश्चित त्यांना लाभ होऊ शकेल. त्याचबरोबर विद्यार्थी नेता म्हणून तयार झालेली नवी इमेजही त्यांचा प्रवास अधिक प्रशस्त करणारी ठरू शकते. पेपरफुटीच्या तपासासाठी चौकशी आयोग नेमतानाच अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले आणि सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठविण्यात आले आहे. हे दोन महत्त्वाचे निर्णय घेतानाच विद्यार्थ्यांसोबतच्या चर्चेकरिता सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पाठविण्याची रणनीतीही महत्त्वाची. आंदोलन नाजूकपणे कसे हाताळायचे, याचा हा वस्तुपाठच. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचेही कौतुक केले पाहिजे. याबाबत देवाभाऊंकडून सध्याच्या शीर्षस्थ नेतृत्वानेही धडे घ्यायला हरकत नाही.
