क्लब रोडवरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद
बेळगाव : क्लब रोडवरील पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातूनच पायपीट करावी लागत आहे. भाऊराव काकतकर कॉलेजच्या प्रवशेद्वारापासून गांधी स्मारकापर्यंतचे पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने पथदीप सुरू करण्याची मागणी केली जात आहे. शहरात अनेक ठिकाणी पथदीप बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. महानगरपालिकेकडून वेळच्यावेळी दुरुस्ती होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शहरातील पथदीप व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेकवेळा तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील महत्त्वाच्या असलेल्या क्लब रोडवर मागील अनेक दिवसांपासून पथदीप बंद आहेत. याच परिसरात बेळगाव क्लब सीपीएड् मैदान तसेच महाविद्यालये व अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्याचबरोबर गोवा, सिंधुदुर्ग व चंदगड येथून शहरात येणारे प्रवासी या मार्गे प्रवास करतात. त्यामुळे पथदीपांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.