उचगाव येथील ओढ्याच्या पात्राने घेतला मोकळा श्वास! माती काढून बिल्डरने ओढा केला खुला
तरुण भारत सोशल मीडिया इफेक्ट
उचगाव / प्रतिनिधी
कोल्हापूर- हुपरी रस्त्यावरील उचगाव हद्दीत असणारा मोठ्या ओढयाचे पात्र एका बिल्डरने छोट्या सिंमेट पाईप घालून मुजवून टाकला होता. नैसर्गिक ओढ्याचे पात्र मुजवल्यामुळे भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार असुन सार्वजनिक बांधकाम खाते, महसूल खाते व उचगाव ग्रामपंचायत यांचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बिल्डराचे धाडस वाढून पूर्ण ओढा बंद करण्याचे धारिष्ट त्याने दाखविलेले होते. यावर तरूण भारतच्या वार्ताहराने आवाज उठवला होता. बिल्डरच्या मुजोरीची बातमी तरुण भारतच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>>उचगाव येथील मोठा ओढा बिल्डराने मुजविला; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; नागरिकांच्यातून संतप्त भावना
या संबंधीची बातमी 'तरूण भारत'च्या बातमीनंत यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांनी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम खाते, उचगाव ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर या बिल्डरने स्वतःच जेसीबीच्या साह्याने तीन ट्रॅक्टर लावून त्वरित ओढ्यातील माती काढण्याचे काम जोरकसपणे सुरू केले असून शुक्रवारी ओढ्याचे पात्र खुले करण्याचे काम चालू होते. यावेळी तलाठी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. सामाजिक संघटनानी ओढ्यावरील पात्र खुले न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी बिल्डर यांनी जेसीबी साठी रस्ता नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात माती ओढली होती. मात्र या घटनेमुळे कोणाला त्रास झाला असल्यास माफी मागून त्वरित ओढ्यातील माती हटवत असल्याचे सांगितले.
दरम्यान, या मोठ्या प्रश्नाला हात घातल्याने परिसरातील येणारे मोठे नैसर्गिक संकट तात्पुरते स्वरूपात टळले आहे. दै. 'तरुण भारत'ने लोक हिताच्या धाडसी बातम्या देण्याची परंपरा चालूच ठेवली असून तरुण भारतचे परिसरातील सर्व थरातून कौतुक होत आहे.
ओढ्याच्या लागून असलेल्या बऱ्याच जणांनी ओढ्यावर अतिक्रमण केलेले आहे. यावर कारवाई होणार का असा संतप्त सवालही यावेळी अनेकांकडूनी विचारला. कोल्हापूर हूपरी रस्त्यावर उचगाव चौका नजीक साधारणतः उजळाईवाडी, सरनोबतवाडी मार्गे उचगावातून मोठा ओढा वाहतो. तो पंचगंगा नदी पर्यंत जातो. दरम्यान, अधिकाऱ्यांनीही ओढा मुजविण्याची कोणालाही परवानगी दिलेली नसून ही बाब गंभीर असून घटनेचा पंचनामा केल्याचे पत्रकारांना सांगितले.