शहीद पोलिसांच्या बलिदानाची गाथा !
सिंधुदुर्ग पोलीस दलाचा रॉक गार्डन येथे खास बॅण्ड शो ; पर्यटक, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण । प्रतिनिधी
शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या सर्वोच्च त्यागाची आणि हौतात्म्याची जाणीव सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण व्हावी तसेच त्यांच्या कुटुंबियांबद्दल आत्मीयता आणि संवेदनशीलता वाढावी या उदात्त हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे येथील रॉकगार्डन येथे आज सायंकाळी आयोजित पोलीस दलाच्या बॅण्ड शो ला चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमातून शहीद पोलिसांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेच्या घटना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस दलाच्या या बँडने सादर केलेल्या देशभक्तीपर आणि प्रेरणादायी सुरावटींनी उपस्थितांची मने जिंकली. शहीदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक नागरिक, पर्यटक या कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद पोलिसांच्या कार्याला सलाम करणारा आणि जनतेमध्ये संवेदनशीलता वाढवणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला.