कोल्हापुरात पहिलं विमान उतरलं त्याची गोष्ट...
पुणे / यशोधन जोशी :
कोल्हापुरातली विमानसेवा हा गेली कित्येक वर्षं आपल्यासाठी जिव्हाळ्याचा विषय होता. आणि सगळं झगडून मिळवायच्या आपल्या कोल्हापूरकरांचा वृत्तीनुसार आपण अनेक वर्षं झगडून अखेर आपला विमानतळ कार्यान्वित झाला. कोल्हापुरात विमानसेवा सुरू झाली ती 1939 साली. छत्रपती राजाराम महाराजांनी या विमानसेवेचं उदघाटन केलं आणि त्यानंतर विमानातून आकाशात जवळ्पास अर्धा तास भरारीसुद्धा घेतली. आपल्या राजधानीकडं आकाशातून बघताना त्यांच्या मनात आनंदाच्या भावना किती उचंबळून आल्या असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
पण कोल्हापुरात उतरलेलं हे काही पहिलं विमान नव्हतं. त्याच्या सात वर्षं आधी 1932 साली कोल्हापूरात एक विमान उतरलेलं होतं. म्हणजे आजपासून फक्त 93 वर्षांपूर्वी कोल्हापुरात पहिलं विमान उतरलेलं होतं. नुकतीच याबद्दलची बातमी मला ज्ञानप्रकाश या तेंव्हाच्या पेपरात मला सापडली. अगदी तारीख वारासकट ही गोष्ट सांगायची तर 25 एप्रिल 1927 ला कोल्हापुरातल्या ब्रिटिश रेसिडेन्सीजवळच्या जुन्या रेसकोर्सवर औंध संस्थानाचे युवराज अप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपले जिप्सी मॉथ हे छोटंसं विमान उतरवलेलं होतं.
औंधचे महाराज कलाप्रेमी राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांचे अप्पासाहेब हे थोरले चिरंजीव. त्याकाळी इंग्लंडमध्ये शिकून आलेले होते आणि त्याकाळी विमान उडवायला शिकलेले हे पहिले संस्थानिक होते. आजच्या भाषेत सांगायचं तर ते विमान उडवण्यात अगदी ‘प्रो‘ होते म्हणायला हरकत नाही. कारण त्याआधी कराची ते औंध ते स्वत: विमान चालवत आलेले होते. आणि यासाठी त्यांना जवळपास 10 तास लागलेले होते.

औंध ते कोल्हापूर हा प्रवास त्यांनी जवळपास तासाभरातच केलेला होता. अप्पासाहेबांनी सकाळी 9.30 वाजता औंधमधून टेक ऑफ घेतला आणि ओगलेवाडीला अर्धा तास ब्रेक घेऊन ते 10.40 ला कोल्हापुरात येऊन पोचले. आपल्या येण्याची सूचना म्हणून कोल्हापूर शहरावरून त्यांनी 5 मिनिटं आपलं विमान उडवलं आणि मग बावड्यापाशीच्या जुन्या रेसकोर्सच्या मैदानावर 10.45 ला त्यांनी आपलं विमान उतरवलं. कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर त्यांनी हा प्रवास खरोखरच 80 नं म्हणजे ताशी 80-85 मैल या स्पीडने केला.
अप्पासाहेबांनी विमान उतरवल्यावर त्यांना ‘रिसिव्ह‘ करायला कोल्हापुरातून श्रीमंत भाऊसाहेब पंतअमात्य बावडेकर, श्रीमंत बाबासाहेब खर्डेकर ही जहागीरदार मंडळी आणि छत्रपती शाहू महाराजांचे घनिष्ठ स्नेही असणाऱ्या रघुपती पंडितांचे चिरंजीव डॉ आप्पासाहेब पंडित आणि बाळासाहेब पंडित ही मंडळी हजर होती. विमान बावड्यातच ‘हँगर‘ला ठेवून युवराज अप्पासाहेब मोटारीने गावात बाळा महाराज पंडितांकडे आले आणि दुपार नंतर पुन्हा औंधला रवाना झाले.
ही बातमी आपल्याला आज माहीत झाली याचं कारण म्हणजे ही ब्रेकिंग न्यूज कव्हर करायला धावलेल्या कोल्हापुरातल्या ज्ञानप्रकाशच्या रिपोर्टरमुळं. या धडाडीच्या कोल्हापुरी (खरं तर कोल्हापूरकर आणि धडाडी हे समानार्थी शब्दच आहेत) रिपोर्टरनं अप्पासाहेब पंतप्रतिनिधी जे काही दोन तास कोल्हापुरात होते तेवढ्या वेळात त्यांना गाठून त्यांची एक छोटीशी मुलाखतच घेऊन टाकली. त्यामुळे तेव्हाचे कोल्हापूरकर आपल्यापेक्षा कमी निवांत हे नक्की!
आप्पासाहेब पंतप्रतिनिधीनी कोल्हापूर शहरावरून 5 मिनिटे जेंव्हा घिरट्या घातल्या असतील तेंव्हा रंकाळ्यावर म्हैस घेऊन चाललेल्या शिवाजी पेठेतल्या एखाद्या बायाक्काबाईंनी, नदीवर धुणं बडवत बसलेल्या शुक्रवारातल्या किंवा बुधवारातल्या तानीबाईंनी, अंबाबाईच्या देवळात गप्पा मारत बसलेल्या बाळाजीपंत आणि दिनकररावांनी, यल्लम्माच्या ओढ्यात डुंबणाऱ्या मंगळवारातल्या तरण्याबांड पोरांनी डोळ्यांवर हात धरून आकाशाकडं बघत काय चर्चा केल्या असतील.
आपल्याला हे विमान बघायला मिळालं याचा आनंद आणि आपलं बघायचं थोडक्यात राहिलं याची हळहळ फार लोकांना झाली असेल. बाकी काही असो पण तेंव्हाच्या कोल्हापुरकर मंडळींना हा विषय ‘चौका-चौकात आणि गटागटाने‘ गप्पा मारायला चर्चा करायला किती तरी दिवस पुरला असेल हे नक्की.