पाकिस्तानातील आणीबाणीची कहाणी
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी रविवारी, खैबर पख्तुनख्वा प्रांतात आणीबाणी जाहीर करून तेथील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रांतीय सरकार बरखास्त केले आहे. 2013 पासून, या प्रांतात या एकाच पक्षाची सत्ता असल्याचे आणि हा पक्ष पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ध्यानात घेता, पाकमधील अंतर्गत स्थिती अधिकच स्फोटक बनल्याचे स्पष्ट होते.
पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी, रविवारी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार, आणीबाणी लागू करणाऱ्या आणि राज्यपाल राजवटीचा कायदेशीर आधार असलेल्या घटनात्मक तरतुदीनुसार, प्रांतीय सरकार यापुढे कामकाज करू शकत नाही, असे घोषित करणाऱ्या एका जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करून, खैबर पख्तुनख्वा प्रांतात आणीबाणीची स्थिती पक्की केली. यानंतर या प्रांताचा थेट ताबा केंद्र सरकारकडे गेला आहे. केंद्र सरकारच्या मते, अफगाणिस्तानला लागून असलेल्या, या प्रांतातील इस्लामी दहशतवादाला तोंड देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानात गेली अनेक वर्षे सातत्याने दहशतवादी हल्ले करत असलेल्या, ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेशी पीटीआय पक्षाचे संबंध असल्याचे आरोपही, एक प्रकारे या घडामोडीस कारणीभूत ठरले आहेत. पंतप्रधान शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने दहशतवादाचा सामना करण्यासाठी प्रांताला, गेल्या 10 वर्षात 800 अब्ज पाकिस्तानी रुपये दिले आहेत, परंतु सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी त्याचा उपयोग झालेला नाही, याउलट दहशतवाद वाढतच गेला.
पाक सरकारच्या या कारणमीमांसेतील प्रमुख विरोधाभास हा की, 75 वर्षांपूर्वीच्या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासून पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी सीमा प्रादेशिक वाद पेटते ठेवण्यासाठी सातत्याने दहशतवादाचा आधार घेतला होता. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हरकत उल-मुजाहिदीन, अल-बद्र-मुजाहिद्दीन, अल कायदा या साऱ्या संघटनांच्या दहशतवादी कृत्यांचे प्रायोजकत्व पाकिस्तानकडे जाते. तेथील सरकारे आणि लष्कराने, या नात्याचा सातत्याने इन्कार केला असला तरी, या दहशतवादाची झळ सोसणाऱ्या भारतासह बांगला देश, अफगाणिस्तान, इराण आणि पाश्चिमात्य देशांनाही त्याचा उपद्रव झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘करावे तसे भरावे’ या न्यायाने, दहशतवादाचा हा भस्मासूर आता निर्मात्याच्याच डोक्यावर हात ठेवण्यास निघाला आहे, याची प्रचिती प्रांतीय आणीबाणीच्या निमित्ताने पाक प्रशासनास येत आहे.
इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी
पीटीआय पक्षाचे सर्वोच्च नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान हे 2023 पासून तुरुंगात आहेत. तुरुंगात असूनही, माजी क्रिकेटपटू असलेल्या या 74 वर्षीय नेत्याचा, पाकिस्तानात मोठा प्रभाव आहे.
ऑगस्ट 2018 मध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाळ सुरु केलेल्या इम्रान खान यांना अविश्वास ठरावात पराभव झाल्यानंतर, एप्रिल 2022 मध्ये पद गमवावे लागले. दोन वर्षांच्या राजकीय अशांततेनंतर पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, या निवडणुकांच्या आधी, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने, अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल पीटीआयचे निवडणूक चिन्ह काढून घेतले गेले. पाकिस्तानमध्ये तब्बल 40 टक्के लोक निरक्षर आहेत हे ध्यानात घेता ‘क्रिकेट बॅट’ हे चिन्ह काढून घेतल्याने पीटीआय पक्ष आपल्या कोणत्याही उमेदवारास तिकीट देऊ शकला नाही. यावर उपाय म्हणून, पक्षाचे सर्व इम्रान समर्थक उमेदवार, वैयक्तिक निवडणुक चिन्हांसह ‘अपक्ष’ उमेदवार म्हणून निवडणुकीस उभे राहिले. आश्चर्य म्हणजे, फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या या सार्वत्रिक निवडणुकांत पीटीआय समर्थक ‘अपक्ष’ उमेदवार सर्वाधिक संख्येने विजयी झाले. पण बहुमतापासून वंचित राहिले. हेराफेरी व भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या या निवडणुकीनंतर, पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ शरीफ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी, या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षांनी इतर पक्षांसह युती करून आघाडी सरकार बनवले. तथापि, खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीटीआय समर्थित अपक्ष उमेदवारांनी, प्रांतीय निवडणुकीत बहुमत आपल्याकडे राखून तेथे सत्ता मिळवली. दरम्यान पीटीआय पक्षास पाकिस्तानच्या राजकारणातून पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी कंबर कसलेल्या, केंद्र सरकारने पक्ष नेते इम्रान खानवर शासकीय देणग्यातील गैरव्यवहार, हिंसाचारास प्रेरणा, बेकायदेशीर विवाह देशद्रोह असे नानाविध आरोप लावत, त्यांची रवानगी दीर्घकालीन तुरुंगवासात केली. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाने, हे आरोप म्हणजे, लष्कर आणि सत्ताधाऱ्यांनी रचलेले षडयंत्र आहे, असे म्हणणे मांडत ते सातत्याने फेटाळले आहेत. तुरुंगात खितपत पडलेल्या इम्रान खान यांच्या सुटकेसाठी, त्यांचा पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शने करत होता. 4 ऑक्टोबर रोजी खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखाली, या प्रांतापासून ते शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी इस्लामाबादपर्यंतचा ‘लाँग मार्च’ आयोजिला होता. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी सरकारवर दबाव आणण्याचा हेतू या नियेजनामागे होता. हजारो निदर्शकांना घेऊन हा मोर्चा पुढे जात असतानाच, सरकारने आणीबाणी घोषित करून या आंदोलनातील हवा काढून घेतली आहे. नेतृत्वासह कार्यकर्त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
प्रांतीय स्थितीस दहशतवादाची जोड
पाकिस्तानात, एकीकडे पीटीआयसारख्या प्रमुख राजकीय पक्षाच्या कारवायांना आळा घालताना, प्रशासन व लष्करास नाकेनऊ येत आहेत. तर दुसरीकडे बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये, अनुक्रमे बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट व इत्तेहाद-उल-मुजाहिदीन या संघटनांच्या दहशतवादास रोखताना लष्कराच्या नाकी दम येत आहे. पाकिस्तानच्या दोन अत्यंत भिन्न प्रदेशात कार्यरत असलेले हे दहशतवादी गट, जरी वेगवेगळ्या परिस्थितींना तोंड देत असले तरी, अधिक संघटित होणे, अधिक जुळवून घेणे आणि आपल्या कार्यशैलीत प्रयोगशील असणे या संदर्भात त्याच्यात आश्चर्यकारक साम्य आहे. पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांच्या सातत्यपूर्ण नाकर्तेपणामुळे, ‘स्वातंत्र्य आणि स्वायत्तता’ या त्यांच्या मुलभूत उद्देशास अधिक बळ प्राप्त झाले आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षात, पाकिस्तानात दहशतवादी घटनांचा आलेख उंचावला असून, देशाची वाटचाल यादवी युद्ध आणि फुटीरतेकडे होताना दिसते. अफगाण तालिबान आणि पाक तालिबान या दहशतवादी वारसा असलेल्या प्रबळ गटांचे, प्रादेशिक व वांशिक स्वारस्य आणि पाकिस्तान विरोध, दुहीच्या भेगा रुंदावत आहेत. त्या इतक्या की, पीटीआयसारख्या लोकप्रिय प्रमुख राजकीय पक्षावर, दहशतवाद्यांशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्याची वेळ, आज सत्ताधाऱ्यांवर आली आहे. गेली अनेक वर्षे दहशतवाद पोसण्यात गुप्तचर यंत्रणा उभारण्यात आणि सुरक्षा क्षमता मजबूत करण्यात पाकिस्तानने बऱ्यापैकी यश मिळवले. परंतु स्वत:च्या पायाखाली काय जळते आहे, हे ओळखण्यात मात्र तेथील लष्करशहा व सत्ताधारी कमी पडले.
अनिल आजगांवकर
