फुकटपूरची कथा
आटपाट नगर होते. त्या नगरात एक धनसेन नावाचा राजा राज्य करत होता. राजाकडे प्रचंड धन होतं. त्याला ते वडिलोपार्जित धन वंश परंपरेने मिळाले होते. कित्येक पिढ्या बसून खातील एवढं ते धन होतं. राजाला मोठेपणा मिळवायला आवडत होता आणि सतत आपला उदो उदो लोकांनी करावा म्हणून तो काही ना काही योजना आखून जनतेला, प्रजेला, खुश ठेवायचा प्रयत्न करायचा. जनतेला लागणारी प्रत्येक गोष्ट तो फुकट देऊ लागला आणि त्याची लोकप्रियता वाढतच गेली. परंतु काही लोकांनी त्याला विरोध केला.
राजांनी सरळ फर्मान काढलं ज्यांना या फुकट योजना नको आहेत, त्यांनी नगराच्या बाहेर जाऊन रहावं. अनेक लोक नगराबाहेर पडले आणि स्वत:ची कामं स्वत: करून कमवून जगू लागले. पण जास्ती लोक मात्र या राजाच्या राजधानीतच राहत होते. त्यांना फुकट पाणी, फुकट वीज, फुकट शाळा, फुकट दवाखाना असं काय वाट्टेल ते सगळं फुकट द्यायला हा राजा तयार झाला होता. त्याच्यामागचं कारण एकच की सगळ्यांनी मला मोठं म्हणावं.
माझं कौतुक करावं, माझा जय जयकार करावा, असं त्याला वाटायचं. असं होता होता काही दिवसांनी राजाच्या लक्षात आलं की, फुकटपूरचे लोक फुकट खाण्यापिण्यात अगदी मश्गुल आहेत. राज्याच्या तिजोरीमध्ये कोणतीही पैशांची वाढ होत नाहीये, कोणीही टॅक्स भरत नाही किंवा कोणी बिलंही भरत नाहीत, कोणतेही काम करत नाहीत. त्यामुळे या सगळ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कोणाचाही उपयोग कामाला येत नव्हता. अशातच जर परकीय आले तर अशा लोकांचा काडीमात्र उपयोग नव्हता. एक दिवस राजा फेरफटका मारायला नगराच्या बाहेर पडला आणि बाहेर आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं जी माणसं कष्ट करून शेतीवाडी करत होती. उद्योगधंदे करत होती ते त्यांचं ते कमवून खात होते ते ज्या गावात राहत होते त्या गावच्या राजाला नित्यनेमाने (महसूल)पैसेही देत होते. हे राज्य धनधान्याने सुसंपन्न असले तरीही, इथला राजा स्वत:ही काम करत होता, हे राजाला लक्षात आलं.
‘जसा राजा तशी प्रजा’ इथे इतरांनाही काम करायची प्रेरणा देत होता. त्यामुळे लवकरच धनसेन राजाला ह्या राजाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार अशी लक्षणे दिसायला लागल्यानंतर मात्र त्यांनी हळूहळू आपल्या राजधानीमध्ये फुकट योजना बंद करायला सुरुवात केली. आता लोक चरफडू लागले, चिडू लागले, राजाला शिव्या देऊ लागले. काही लोक तर राजाला मारण्याची सुद्धा योजना करू लागले. ही गोष्ट जेव्हा शेजारच्या राजाच्या कानावर गेली तेव्हा त्याला आनंद वाटला. उशीरा का होईना! धनसेन राजाला बुद्धी आली पण आता धनसेनाची सत्ता हातातून जायची वेळ आली होती आणि शेजारच्या राज्यातला शूरसेन असेल हे सगळे सत्ता आपल्या ताब्यात घेणार होता पण ती घेताना मात्र त्यांनी आपल्या गावचेच नियम ह्या राजधानीतल्या लोकांना लावले आणि सर्वांना कामाला लावले.
इतके दिवस फुकट खाणाऱ्यांना ते जड जाऊ लागले पण जो कसेल त्याची जमीन, जो पिकवेल त्यालाच धान्य मिळेल, जो काबाडकष्ट करेल त्यालाच रोजगार मिळेल, कोणतीही गोष्ट इथे फुकट मिळणार नाही. आपण या राष्ट्राचे पाणी, वीज, हवा सगळं मोफत वापरतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला सुरुवात केली आणि राज्यामध्ये सर्वत्र आनंदी आनंद सुरू झाला...