गोष्ट एका बापाची
त्याला बघायचा योग माणसाला नेहमीच येतो. रुळावरून, रस्त्यावरून, वेगाने धावताना झाडे आपल्यासोबत पळत असतात, परंतु तो मात्र निश्चल असतो. ध्यानस्थ, तटस्थ, कधी रखरखीत तर कधी हिरवी झूल पांघरून तो फक्त बघत असतो. त्याच्या माथ्यावरचे देऊळ तेवढे घंटानाद करीत असते. गाईगुरे त्याच्या अंगाखांद्यावर चरत, खेळत असतात. त्याच्याजवळ गेलो तर आपले मन खट्टू होते. तो दुरून दिसतो तेवढा सुंदर आणि आकर्षक नसतो. म्हणून तर म्हणतात ना ‘दुरून डोंगर साजरे.’ जंगलात राहूनही तो माणसांच्या शब्दांमध्ये सारखा डोकावतो. रोज कामाचा डोंगर उपसावा लागतो, ‘आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार’, डोंगराएवढे उपकार झाले, डोंगर पोखरून उंदीर निघाला...वगैरे.
डोंगररांगांमधला सूर्य आपल्या मनात कायम प्रकाशित असतो. चित्र काढायचे म्हटले की आधी तो कागदावर साकार होतो. एवढा आपल्या आयुष्यात लुडबुड करणारा हा डोंगर, पण त्याच्या प्रत्यक्ष भेटीला माणूस सहसा जात नाही. कारण ती चढण त्याला सोसवत नाही. पायात गोळे येतात. त्याचा पायथा बरा वाटतो. त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या झोपडीत काही काळ विसावलो तरी न कळणारे आश्वासक सुख लाभते. हे सुख एका बापमाणसाचे असते. जगण्याचा आधार डोंगराच्या कुशीत, पोटात मिळत असावा माणसाला बहुतेक. त्याचे आणि माणसाचे नेमके नाते तरी असते कुठले?
एक दिवस हे नाते उलगडले आणि मनात आनंद भरून गेला. कोकणातल्या आंबोली घाटामध्ये धरतीच्या हिरव्यागार कुशीत नदीला बघायला जाण्याचा योग आला. जाताजाता तिचा नाजूक खळखळाट कानावर पडत होता. पायात जणू पैंजण घालून ती दुडूदुडू धावत होती. वळणावळणांनी पाल्यापाचोळ्यासकट पोपटी, शेवाळी, हिरवा, मध्येच लाल रंगाची झबली घालून ती पुढेपुढे पळत होती. ती काठ सोडून पळत होती. त्यामुळे तिच्याबरोबर कसे जायचे म्हणून तिच्या जन्मघरी पाय चालू लागले. चालता चालता पाय थबकले. तोच दिसला पहिल्यांदा. पाय दुमडून आत आत गेलेला. लेकीला जन्म देणारा, प्रसवणारा, वत्सल. काळा, ओलसर मऊ डोंगर. पाझर म्हणजे काय ते सांगणारा बाप. त्याची लेक तान्ही. नुकतीच जन्मलेली. तिचे नामकरणही तिथेच झाले. ‘हिरण्यकेशी’ तिथे तिला नदीपण नव्हते. तो होता चिमुकला झरा. बापाच्या कुशीतून आनंदाने बाहेर पडणारा. हा इवलासा झरा पुढे इतका मोठा कसा होतो की त्याला घाट बांधावा लागतो? आणि एवढा वेग तरी त्या नदीला लाभतो कसा? बापाच्या कुशीत हातपाय हलवत, नाचत, पळत जाणारी ही नदी खरेच का या तटस्थ, निश्चल, ठाम बापाची मुलगी असते? ती तर कमालीबाहेर चंचल, तीव्र वेगाने धावणारी, पूर घेऊन अस्ताव्यस्त पसरणारी चंचला असते. कविमनाला याचे कोडे पडले नाही तरच ते नवल.
इंदिराबाई संत या कवयित्रींना वाटते, हा डोंगर स्थिर. यातून हे वारंवार रंग आणि वेग घेणारे मनस्वी प्रवाही नदीचे रूप आले कुठून? त्यांना वाटते, ही वसुंधरा त्या तेजोनिधी सूर्याच्या प्रेमात पडली खरी, परंतु तिला काही त्याला भेटता येत नाही. तिचा असह्य दुरावा, ध्यास, तिच्या प्रीतीचे विविध रूपातले भाव या नद्यांच्या रूपाने प्रकट झाले. म्हणजे काय तर ही जलवाहिनी म्हणजे धरित्रीची कविता. केवढा सुंदर भाव वर्णन केला आहे! धरित्रीला सूर्याला भेटता येत नाही म्हणून ती तिची आस पूर्ण करण्याकरता जलवाहिनी होऊन महासागराकडे धावत सुटते. ती आपले नाव, गाव, कुळ विसरून सागरात विलीन होऊन जाते. वाफ होऊन वर सूर्याकडे जाते. डोंगर, धरती आणि नदी यांचा कोणता ऋणानुबंध आहे? डोंगराचे प्रतिबिंब लेऊन नदी प्रवाहित होते. त्याच्या अस्तित्वातून तिची ओळख निर्माण होते. पुढे ही चिमुकली कन्या जेव्हा आईचे रूप घेऊन सुजलाम सुफलाम होते तेव्हा वेगवेगळ्या नावांनी प्रकट होते. धरित्रीची वेदना उरात बाळगून ती मधुर जळाचा त्याग करून खारट पाण्यात विलीन होते. नदी जेव्हा समुद्राला समर्पित होते तेव्हा तिची नैसर्गिक ओढ थक्क करणारी असते. नदीची हीच ओढ निसर्गाने स्त्राrला बहाल केली असावी. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘जैसे सरिता ओघ समस्त। समुद्रामाजी मिळत। परी माघौते न समात। परतले नाही?’ सर्व नद्या समुद्राला मिळतात. पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या असे केव्हाही होत नाही. त्याप्रमाणे थोर योग्यांची बुद्धी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होते, पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन्हा देहतादात्म्यावर येत नाहीत.
सृजन आणि संहार यांचा स्वामी शिवशंकर. त्याचे वास्तव्य डोंगर माथ्यावर असते. जात्यावर दळताना ओव्या गाणाऱ्या आमच्या विदुषी स्त्रिया म्हणतात, एकदा काय झाले, पावसाने डोंगर भिजला आणि महादेवही भिजले. डोंगरानी मग हिरवा शेला पांघरला. परंतु महादेवाजवळ शेला नव्हता, तेव्हा पार्वतीमाईने आपल्या अंगावरचा पदर त्याच्या अंगावर झाकला. त्या हिरव्या पदराने भिजलेला महादेवही झाकला. ‘हा डोंगर आत्म्यासारखा स्थिर, अचल आहे. नदी ही प्रकृतीसारखी आहे. या डोंगराचे प्रतिबिंब तेवढे तिच्यात पडते. वेगाने वाहणारी नदी अजूनपर्यंत ते प्रतिबिंब आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकली नाही’, असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. नदी म्हणजे प्रकृती. जिच्यामुळे सृष्टीत चेतना आहे. हालचाल आहे. डोंगर चैतन्य आहे. या दोघांच्या अद्वैतामुळेच जग दृश्य स्वरूपात आपल्याला दिसते आहे.
ग. दि. माडगूळकरांची अप्रतिम कविता आहे--
‘नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर!’
नदी माघारी फिरत नाही, ती सागरात मिसळून जाते
हे खरे असले तरी कवी म्हणतात-
जीवन नदीचे घेता पोटात सागर
तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर!
डोंगराच्या मायेसाठी रुप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन!
पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा!
डोंगराचे आणि समस्त सृष्टीचे प्राणाचे नाते आहे. तो जलदाता आहे. तो जीवसृष्टीचा पोशिंदा आहे. तो बाप आहे. धरतीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या आपल्या कन्येला त्याने केवढी श्रीमंती दिली! नदीची आई होते. तिचा गौरव होतो. तिचा सागराशी एकरूप होण्याचा सोहळा होतो. आईपण नेहमीच कळते. पण बाप समजतो असे नाही. डोंगर म्हणजे काय तर श्वासाचा उगम आणि जगण्याचा आनंद. त्याचे व माणसाचे नाते उमजणे हा अमृतक्षण. माणूसपण समजावून सांगणारा तो सर्वांचाच बाप आहे.
-स्नेहा शिनखेडे