For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गावडेंविरुद्धचे वादळ चहाच्या पेल्यातले!

03:20 PM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
गावडेंविरुद्धचे वादळ चहाच्या पेल्यातले
Advertisement

गावडेंच्या भेटीने नरमले दामू नाईक : मुख्यमंत्र्यांनी गमावली नामी संधी

Advertisement

पणजी : संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या निवेदनानंतर त्यांचे धोक्यात आलेले मंत्रीपद आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी शिस्तभंगाची कारवाई करू, असा दिलेला इशारा आणि त्यातून निर्माण झालेले वादळ हे अखेर चहाच्या पेल्यातले वादळ ठरले आहे. काल सोमवारी दामू नाईक हे मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर गोविंद गावडे यांना भेटल्यानंतर दामू नाईक यांचा नूर बदलल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांनी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे जाहीर केले.

नाईक यांचा निवळला राग

Advertisement

प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री स्वत: मंत्री गावडे यांचे जोरदार समर्थन करीत आहेत. दामू नाईक यांनी शिस्तभंग कारवाई करू, असा इशारा दिला होता. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दुपारी भेट झाली आणि त्यावेळी सविस्तर चर्चेअंती दामू नाईक यांचा जो राग होता तो बऱ्यापैकी निवळलेला दिसला. पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी सांगितले की, आपण मंत्री गावडे यांचे म्हणणे ऐकून घेतले. आता ते म्हणणे पक्षश्रेष्ठींकडे पाठविणार आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील.

मुख्यमंत्र्यांना होती नामी संधी

गेले दीड वर्ष राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आले. प्रत्यक्षात मात्र गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्याला वगळण्याची नामी संधी आली होती, मात्र त्या संधीचा वापर त्यांनी केला नाही. त्यातच प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक आणि माजी अध्यक्ष व खासदार सदानंद शेट तानावडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची हीच वेळ आहे, असे स्पष्ट केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही ऐकले नाही. अखेरीस दामू नाईक यांनी दिल्लीहून परतल्यानंतर सोमवारी दुपारी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोविंद गावडे यांची बाजू जाणून घेतली.

या भेटीनंतर दामू नाईक यांची देहबोली आणि त्यांनी केलेले निवेदन पाहता त्यांच्या मनातील राग निवळला आणि त्यामुळेच मंत्री गावडे यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे. दामू नाईक म्हणाले, मंत्री गावडे यांची बाजू ऐकून घेऊन आपण अहवाल दिल्लीला पाठविला आहे. आता सारे काही दिल्लीहून भाजप केंद्रीय नेतृत्व ठरवेल. तसेच मंत्रिमंडळाची फेररचना हे सारे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येते, आपण पक्ष संघटना पाहतो. राजकीय निर्णय घ्यायचे असतील तर ते मुख्यमंत्री घेतील, असे सांगून नाईक यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. एकंदरीत परिस्थिती पाहता गोविंद गावडे यांना ‘देव पावला’असे म्हणावे लागेल. गेले काही दिवस चालू असलेले वादळ हे चहाच्या पेल्यातील ठरले.

म्हणजे मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप सत्य !

मंत्री गावडे यांनी मुख्यमंत्री व त्यांच्या एकंदरीत कारभारावर केलेला जोरदार हल्ला मुख्यमंत्री विसरले आणि आता भारतीय जनता पक्ष देखील विसरून जाईल, असा अंदाज आहे. केवळ छोटासा इशारा देऊन गावडे यांचे मंत्रीपद राखून ठेवले जाईल असा अंदाज आहे. तसे झाल्यास मंत्री गावडे यांनी एकंदरीत भाजप सरकारवर केलेले आरोप हे सत्य आहेत, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये पसरला आहे. त्यामुळेच मंत्री गावडे यांना पूर्णत: राजकीय संरक्षण देण्याचा हा इरादा आहे, असे बोलले जात आहे.

Advertisement
Tags :

.