आठवड्याची शेअरबाजाराची सुरुवात घसरणीने
सेन्सेक्स 352 अंकांनी घसरणीत, एशियन पेंटस्चे समभाग घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद झालेला पहायला मिळाला. सेन्सेक्स निर्देशांक 352 अंकांनी घसरणीत राहिला. यामध्ये एशियन पेंटस् व अलकेम लॅब यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. पेटीएमचे समभाग मात्र तेजीत होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 352 अंकांनी घसरत 72 हजार 790 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 90 अंक घसरणीसह 22122 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक कमकुवत कामगिरी बजावत होता. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक काहीशी तेजी दर्शवित बंद झाला. शेअर बाजारात लार्सन टूब्रो, पॉवर ग्रिड कॉर्प, एचयूएल आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले तर एशियन पेंटस्, टाटा स्टिल, टेक महिंद्रा आणि टायटन यांच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. कर संबंधित वाद उदभवल्या कारणाने अलकेम लॅब कंपनीचे समभाग सोमवारी सर्वाधिक घसरणीत पहायला मिळाले. सदरचा कंपनीचा समभाग 13 टक्के इतका घसरणीत होता. दुसरीकडे काही दिवसापूर्वीच रंग उत्पादनामध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज यांचा समावेश झाल्याने याचा परिणाम एशियन पेंटस्च्या समभागावर सोमवारी पहायला मिळाला. पेटीएमचे समभाग 5 टक्के वाढीसोबत बंद झाले. निफ्टीतील माध्यम निर्देशांक सोडल्यास इतर सर्व निर्देशांक कमकुवत दिसून आले.
अदानी एंटरप्रायझेस आणि बीपीसीएल यांचे समभाग बऱ्यापैकी तेजीत होते. तर अपोलो हॉस्पिटल, हिंडाल्को आणि टायटन यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत राहिले होते. सोमवारी दिवसभरामध्ये बाजारात चढउतार पहायला मिळाला. पॉवरग्रीड कॉर्प, अदानी एंटरप्रायझेस, एसबीआय लाईफ, अदानी पोर्टस् आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग 52 आठवड्यानंतर उच्चांकावर कार्यरत होते. निफ्टी आयटी निर्देशांक 1.022 टक्के तेजीसह बंद झाला. बँक निर्देशांक अर्धा टक्का कमकुवत होऊन बंद झाला. ऑटो निर्देशांक काहीसा तेजीत होता. फार्मा, एफएमसीजी, फायनॅन्शियल सर्व्हिसेस, मिडकॅप, स्मॉल कॅप यांचे निर्देशांक घसरणीत होते.