शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात घसरणीने
नफा वसुलीने बाजारात दबाव : अदानींचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजार घसरणीसह बंद झाला आहे. तीन दिवसांच्या सलगच्या तेजीला सोमवारी ब्रेक लागला. बँकिंग आणि आयटी समभागांच्या कमकुवत कामगिरीचा फटका शेअरबाजाराला बसला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 168 अंकांच्या घसरणीसह 71315 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 38 अंकांच्या घसरणीसोबत 21418 अंकांवर बंद झाला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांच्या निराशादायक कामगिरीचा फटका बाजारावर दिसून आला. बाजारात बजाज ऑटो, हिंडाल्को, अदानी पोर्टस्, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फायनान्स, आयशर मोटर्स, एशियन पेंटस्, टायटन, डिव्हीस लॅब्ज यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. मुळात सकाळी शेअरबाजाराची सुरुवात घसरणीसोबत झाली होती. नफावसुलीमुळे शेअरबाजारात दबावाचे वातावरण दिवसभर राहिले होते. निफ्टी मिडकॅप 100 0.20 टक्के तेजी राखत बंद झाला तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.51 टक्के वाढीसह बंद झाला. निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक कमकुवत दिसून आला.
समभागांचा विचार करता सोमवारी पॉवरग्रिड कॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी यांचे समभाग घसरणीसह कार्यरत होते. मल्टीबॅगर समभागांपैकी ओम इन्फ्रा, एक्साइड इंडस्ट्रिज, कामधेनू लिमिटेड, पटेल इंजिनियरिंग, ब्रांड कॉन्सेप्ट, स्टोव्ह क्राफ्ट आणि जियो फायनॅन्शीयल यांचे समभाग तेजीत होते. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, युनिपार्टस् लिमिटेड व देवयानी इंटरनॅशनल यांचे समभाग मात्र नुकसानीसोबत कार्यरत होते. दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील 9 लिस्टेड कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे समभाग घसरणीत होते. अंबुजा सिमेंट, एसीसी आणि अदानी पोर्टस् यांचे समभाग मात्र तेजीसह कार्यरत होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभागांमध्ये घसरण तर 10 समभागांमध्ये तेजी होती.