शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात घसरणीने
सेन्सेक्स 450 अंकांनी घसरणीत: धातू निर्देशांक दबावात
वृत्तसंस्था / मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात खराब झालेली पाहायला मिळाली. सेन्सेक्स 450 तर निफ्टी 168 अंकांनी घसरणीत राहिला. ऑटो, धातू, सार्वजनिक बँक व मीडिया हे निर्देशांक नुकसानीसह बंद झाले आहेत.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 450 अंक घसरत 78248 च्या स्तरावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 168 अंकांनी घसरत 23644 अंकांवर बंद झाला. सुरुवातीला बाजार काहीसा नुकसानीसह खुला झाला होता पण शेवटच्या सत्रात मात्र अचानक विक्रीने जोर पकडला. यामुळे वरच्या स्तरावरुन बाजार एकदम खाली आला. सोमवारच्या सत्रातील कामगिरीवर नजर टाकली असता निफ्टीत अदानी एंटरप्रायझेस यांचा समभाग दमदार तेजीसह आघाडीवर राहिला. यांचा समभाग 7 टक्के वाढीसह 2592 च्या स्तरावर बंद झाला. तर एचसीएल टेक 1.96 टक्के वाढीसोबत 1929 रुपये, टेक महिंद्रा 1.71 टक्के वाढीसह 1741 रुपये, आणि इंडसइंड बँकेचे समभाग 1.06 टक्के वाढीसोबत 963 रुपयांवर बंद झालेले पाहायला मिळाले.
हे समभाग घसरणीत
याचदरम्यान बाजारात धातू क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंडाल्कोचे समभाग 2.65 टक्के इतके घसरत 601 रुपयांवर राहिले होते. बीइएलचे समभाग 2.45 टक्के घटत 284 रुपये, ट्रेंट 2.31 टक्के घटत 6954 रुपये, टाटा मोटर्स 2.25 टक्के घसरत 733 रुपये आणि सरकारी कंपनी ओएनजीसीचे समभाग 1.80 टक्के घसरत 232 रुपयांवर बंद झाले होते.
निर्देशांकांची कामगिरी
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकात पाहता फार्मा आणि आयटी निर्देशांकांनी केवळ सकारात्मक कामगिरी केली होती. फार्मा निर्देशांक 1.01 टक्के वाढत 23241 च्या स्तरावर तर आयटी निर्देशांक 0.57 टक्के वाढत 43971 च्या स्तरावर बंद झाला.