For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात घसरणीने

06:58 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात घसरणीने
Advertisement

ट्रम्प यांच्या शुल्क घोषणेचा परिणाम : स्मॉलकॅप सर्वाधिक घसरला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजारात ट्रम्प इफेक्ट दिसून आला. सुरवातीच्या सत्रात मोठ्या प्रमाणात घसरलेला सेन्सेक्स सावरत 319 अंकांनी घसरणीसह बंद झाला. स्मॉल कॅप निर्देशांक सर्वाधिक घसरणीत राहिला होता.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 319 अंकांनी घसरत 77,186 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 121 अंकांनी घसरत 23,361 अंकांवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 887 अंकांनी कोसळला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग घसरणीत तर 11 समभाग तेजी राखून होते. निफ्टीतील 50 पैकी 35 समभाग नुकसानीसोबत तर 15 समभाग तेजीसोबत बंद झाले होते. ऑइल अँड गॅस क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक 2.22 टक्के घसरणीत होता. विदेशी गुंतवणूकदारांनी 1327 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले. लार्सन टुब्रो, रिलायन्स, आयटीसी, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, एचयुएल आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीत राहिले. तर बजाज फायनान्स, विप्रो, श्रीराम फायनान्स, भारती एअरटेल मारुती सुझुकी यांनी वधारत बाजाराला सावरण्याचे काम केले.

भारतीय शेअरबाजारात सोमवारी मोठी घसरण अनुभवायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 500 अंकांच्या घसरणीसोबत तर निफ्टी 23,300 च्या खाली सुरु झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध देशांवर व्यापारी कर वाढवण्याच्या निर्णयावर आशियाई बाजारात घसरण दिसली. याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर दिसला. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाही मोठ्या प्रमाणात घसरणीत होता. सेन्सेक्स 500 अंकांच्या घसरणीसोबत 77,063 अंकांवर खुला झाला होता यादरम्यान सेन्सेक्स 1 हजार अंकांपर्यंत कोसळला होता.

ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या वस्तु व सेवांवर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या आयातीत वस्तुंवरही 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली असून मंगळवारपासून हे शुल्क तात्काळ लागू होणार आहे. याचदरम्यान भारताच्या नजरा आता ट्रम्प यांच्याकडे वळल्या आहेत. चांगल्या बजेटनंतर सोमवारी ट्रम्प यांच्या शुल्क आकारणीच्या घोषणेने बाजारातला माहोल बिघडवून टाकण्याचे काम केले.

याचदरम्यान भारतीय रुपयाही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत होताना दिसला. सुरुवातीच्या सत्रात रुपया 67 पैसे घसरत 87.29 वर घसरला होता, जो विक्रमी नीचांकी स्तरावर होता. शनिवारी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, त्यादिवशी भारतीय शेअरबाजार सुरु राहिला होता. दोन्ही बाजार त्यादिवशी सपाट स्तरावर बंद झाले होते.

Advertisement
Tags :

.