बुधवारी शेअरबाजारात परतली पुन्हा तेजी
सेन्सेक्स 443 अंकांनी तेजीत : एफएमसीजी निर्देशांकाची चमक, बँक निफ्टी 490 अंकांनी वधारला दोन दिवसांच्या घसरणीच्या सत्रानंतर बुधवारी भारतीय शेअरबाजारात तेजी परतली आहे. सेन्सेक्स 443 अंकांनी आणि निफ्टी 140 अंकांनी वधारत बंद झाला. एफएमसीजी निर्देशांकाने दमदार तेजी अनुभवली आहे.
वृत्तसंस्था, मुंबई
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 443 अंकांनी वधारत 76922 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 140 अंकांनी वधारत 24005 अंकांवर बंद झाला.
हे समभाग वधारले
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी बाजारात तेजी परतली. बुधवारच्या सत्रात पाहता निफ्टीत इटर्नलचा समभाग 5.8 टक्के, अदानी एंटरप्रायझेसचा समभाग 3.52 टक्के, नेस्ले इंडिया 3.4 टक्के व एशियन पेंटस्चा समभाग 3 टक्के इतका तेजीत राहिला होता. मिडकॅप निर्देशांकात डिलीव्हरीचा समभाग सर्वाधिक 7.55 टक्के इतका वधारला होता. यापाठोपाठ वन 97 अर्थात पेटीएम 5.4 टक्के, पेज इंडस्ट्रिज 5.4 टक्के, गोदरेज प्रॉपर्टीज 4.98 टक्के आणि प्रेस्टीज इस्टेटस व कोलगेट हे अनुक्रमे 3 टक्के वधारासह बंद झाले. याखेरीज हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक, एसबीआय, ग्रासिम, बजाज ऑटो, सनफार्मा, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, जियो फायनान्स, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडिगो, टाटा कंझ्युमर व ट्रेंट यांचेही समभाग तेजीत होते.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे पाहता निफ्टीत एचसीएल टेक व टेक महिंद्रा यांचे समभाग 3 टक्क्यांहून अधिक घसरले होते. यापाठोपाठ इन्फोसिस, टीसीएस, हिंडाल्को, टाटा स्टील यांचे समभाग 1 ते 2 टक्के इतके घसरले होते. मिडकॅप निर्देशांकात केपीआयटी टेक्नॉलॉजीच्या समभागाने सर्वाधिक घसरण नोंदवली. हा समभाग जवळपास 16 टक्के इतका घसरला. एकाच दिवसात 114 रुपयांनी समभाग घसरणीत राहिला. यानंतर आयजीएल समभाग 7.97 टक्के घसरला होता. यापाठोपाठ कोफोर्ज, टाटा इएलएक्सएसआय हे समभाग 6 टक्के इतके घसरले होते. तसेच निफ्टीत सिप्ला, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन टुब्रो, एचडीएफसी बँक, हिंडाल्को, डॉ. रे•िज लॅब्ज यांचे समभाग घसरले होते.
क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता ऑटो, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, ऑईल व गॅस व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. एफएमसीजी निर्देशांक सर्वाधिक 1012 अंकांनी वधारत 49806 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे कमोडिटीज, आयटी, फार्मा, मेटल यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले.