शेअर बाजाराने केले एप्रिलमध्ये कमबॅक
एप्रिलमध्ये 51 लाख कोटी रुपयांची वाढ, बाजार भांडवलात विक्रमी वाढ
मार्चमध्ये घसरणीत असलेल्या भारतीय शेअरबाजाराने एप्रिलमध्ये कमबॅक केल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्यात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल्याचे पहायला मिळाले. एकंदर बाजार भांडवलामध्ये एप्रिलमध्ये 51 लाख कोटीची वाढ झाली.
त. भा. वृत्तसंस्था, मुंबई
एप्रिलने भरुन काढले मार्चचे नुकसान एप्रिलमध्ये देशातील सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य 51 लाख कोटी रुपयांनी वाढत 463.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही सदरच्या महिन्यातील वाढ आतापर्यंत सर्वाधिक मासिक वाढ म्हणून नोंदली गेली आहे. याने मार्च 2025 मध्ये नोंदवलेली 28.9 लाख कोटी रुपयांचा टप्पा मागे टाकण्यामध्ये यश मिळविले आहे. मार्चमध्ये बाजारभांडवलामध्ये मोठी घसरण दिसून आली होती. सदरची घसरण ही पश्चिम आशियामधील वाढत्या तणावामुळे अनुभवायला मिळाली. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि देशांतर्गत समभागांमध्ये कमकुवतता पहायला मिळाली.
सेन्सेक्स, निफ्टी वधारला
एप्रिलमध्ये बेंचमार्क निर्देशांक जबरदस्त वाढलेला दिसला. सेन्सेक्स 6.9 टक्के तर दुसरीकडे निफ्टी निर्देशांक 7.5 टक्के इतका वधारलेला दिसला. या दोन्ही निर्देशांकांची डिसेंबर 2023 नंतरची सर्वोत्तम मासिक कामगिरी मानली जात आहे. मार्चमध्ये देशातील बाजार भांडवलाचे जे नुकसान झाले होते ते एप्रिलमध्ये भरुन निघाले आहे. यापूर्वी एकंदर बाजार भांडवल मूल्याने 2 जानेवारी रोजी 481 लाख कोटी रुपयांची सर्वोच्च कामगिरी नोंदवलेली आहे. त्यापेक्षा सध्याला 18 लाख कोटी रुपये मूल्य कमीच राहिलेले आहे.
असे जरी असले तरी सेन्सेक्स जरी आपल्या विक्रमी 85836 या स्तरापेक्षा 11टक्के खालीच आहे. निफ्टीने सुद्धा विक्रमापेक्षा 9 टक्के खाली राहणे पसंत केले आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप अनुक्रमे आपल्या सर्वोच्च स्तरापासून क्रमाश: 2.7 टक्के, 8.4 टक्के कमकुवत आहेत.
होर्मुझचे संकट
होर्मुझमधून तेलाची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणे आवश्यक असणार आहे. त्यामध्ये खंड झाल्यास सर्वच देशांमध्ये अस्थिरता वाढणार असून महागाईदेखील डोकेवर काढणार आहे. अलिकडेच केंद्रिय पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी सोशल मीडियावरती निवडणूक निकालानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती 25 रुपयांनी प्रतिलिटर वाढणार असल्याचे प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे सामान्यांमध्ये चिंता राहिली होती.
युद्दाचे सावट कायम
तज्ञांच्या मते पश्चिम आशियामध्ये अद्यापही युद्धाचे सावट कमी झालेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पुन्हा इराणवर हल्याची धमकी दिल्यामुळे शेअर बाजार आता सोमवारी कसा प्रतिसाद देतो हे पाहावे लागणार आहे. जोपर्यंत युद्धाला पूर्णपणे सामंजस्यातून विराम मिळत नाही. तोपर्यंत शेअर बाजारातील स्थिती ही चढउतारांची राहणार असल्याचे तज्ञांना वाटते आहे. कच्च्या तेलाच्या किमती आता मात्र 125 डॉलर प्रति बॅरेलच्या नव्या टप्प्यावरती पोहोचल्याने बाजारातील गुंतवणुकदारांची चिंता अधिकच वाढली आहे.