शेअरबाजारात पुन्हा परतली तेजी
सेन्सेक्स 874 अंकांनी वधारला : आयटी, बँकांचे निर्देशांक तेजीत
मुंबई :
जागतिक बाजारात मंदीच्या शक्यतेमुळे गेले दोन दिवस भारतीय शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाला होता पण बुधवारी मात्र शेअरबाजारात नव्याने चांगली तेजी परतली आहे. सेन्सेक्स 874 अंकांनी तर निफ्टी 304 अंकांनी वधारलेला दिसला.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 874 अंकांनी वधारत 79468 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 304 अंकांनी वधारत 24297 अंकांवर बंद झाला होता. सकाळच्या सत्रात 1 हजार अंकांची तेजी बाजारात सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली. सकाळी निफ्टी निर्देशांक 297 अंकांच्या वाढीसह 24290 वर तर सेन्सेक्स निर्देशांक 972 अंकांच्या वधारासह 79565 अंकांवर खुला झाला होता. मिडकॅप 100, निफ्टी आयटी, निफ्टी बँक यांच्यासह विविध क्षेत्राच्या निर्देशांकात तेजी दिसून आली. निफ्टी आयटी 1.48 टक्के वाढत बंद झाला. ऑइल अँड गॅस निर्देशांक 3.06 टक्के इतका वाढला. मीडिया, हेल्थकेअर आणि फार्मा निर्देशांक 2 टक्के इतके वाढले होते. अदानी पोर्टस् आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग 3 टक्के इतके सर्वाधिक वधारलेले दिसले. यासोबत जेएसडब्ल्यू स्टील 2.54 टक्के, टाटा स्टील 2.36 टक्के आणि इन्फोसिसचे समभाग 2.32 टक्के इतके वाढत बंद झाले. दुसरीकडे इंडसइंड बँकेचे समभाग बाजारात सर्वाधिक घसरलेले होते. 2.60 टक्के इतकी घसरण या समभागात दिसली. टेक महिंद्रा, टायटन, भारती एअरटेल, एशियन पेंटस् आणि एचयुएल यांचे समभागही नुकसानीसोबत बंद झाले. निफ्टीत 50 पैकी 44 समभाग हे तेजीत होते तर 6 घसरणीसह बंद झाले. ओएनजीसीचे समभाग 7.45 टक्के इतके वाढले होते.
मंगळवारी अमेरिकेतील बाजारात डोव्ह जोन्स 0.76 टक्के वाढत 38,997 अंकांवर बंद झाला. युरोपातील बाजारातही तेजी होती. निक्केई 414 अंक, हँगसेंग 230 अंक, कोस्पी 46 अंक आणि शांघाई कम्पोझीट 2 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. 6ऑगस्ट रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 3531 कोटी रुपयांचे समभाग विकले.