आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार घसरणीत
सेन्सेक्स 670 अंकांनी घसरला : आयटी समभाग दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील दबावामुळे भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी घसरणीसोबत बंद झालेला पहायला मिळाला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांच्या नकारात्मक कामगिरीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 671 अंकांनी घसरण नोंदवत 71,355 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 197 अंकांनी घसरत 21,513 अंकांवर बंद झाला. सोमवारी निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.09 टक्के कमकुवत होता. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 0.28 टक्के घसरणीत होता. आयटी आणि बँकिंगचे निर्देशांक 1 टक्के घसरणीत राहिले. दुसरीकडे अदानी पोर्टस, ओएनजीसी, एचसीएल टेक आणि हिरोमोटो कॉर्प यांचे समभाग तेजीसह बंद झाले. युपीएल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाईफ आणि एसबीआय यांचे समभाग घसरणीत राहिले होते. बँकिंग क्षेत्रातील समभाग आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग कमकुवत राहिल्याने सेन्सेक्स निर्देशांकावर त्याचा थेटपणे परिणाम पहायला मिळाला. देवयानी इंटरनॅशनल, टाटा मोटर्स, पटेल इंजिनिअरिंग, एचडीएफसी लाईफ, जिओ फायनान्सियल, आयसीआयसीआय बँक, ग्लोबल स्पिरीट, एक्साईड इंडस्ट्रीज, महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. अदानी समूहातील 10 पैकी 8 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. बजाज फायनान्स, पतंजली फूड्स, आयआरसीटीसी, गार्डन रिचशीप बिल्डर आणि गरवारे टेक्निकल फायबर यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 24 समभागांमध्ये घसरण पहायला मिळाली. एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांकदेखील कमकुवत दिसून आला. अदानी समुहातील एससीसी सिमेंटने एशियन काँक्रिट्स अँड सिमेंट प्रायव्हेट लि. चे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. मंगळवारी 9 जानेवारी रोजी ज्योती सीएनसी अॅटोमेशन लि. यांचा आयपीओ सबस्क्रिपशनकरीता खुला होणार आहे.