पहिल्या श्रावणसोमवारी शेअरबाजार कोसळला
जागतिक चिंतेने निफ्टी 662 अंकांनी कोसळला : 16 लाख कोटी बुडाले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराने श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी मोठी घसरण नोंदवली आहे. अमेरिकेत मंदीच्या शक्यतेसोबत जागतिक चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याने शेअरबाजारात मोठी पडझड झाली. 30 समभागांचा सेन्सेक्स तब्बल 2222 अंकांनी आणि निफ्टी 662 अंकांनी कोसळला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 2222 अंकांनी घसरत (2.74 टक्के) 78759 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 662 अंकांनी घसरत 24055 (2.68 टक्के)अंकांवर बंद झाला होता. निफ्टी रियल्टी, धातू, सरकारी बँक आणि माध्यम निर्देशांक 4 टक्क्याहून घसरणीत होते. बाजारातील गुंतवणूकदारांचे सोमवारी अंदाजे 16 लाख कोटी रुपये बुडाल्याची माहिती आहे. ऑटो, आयटी आणि ऑइल अँड गॅस निर्देशांकही 3 टक्के घसरणीत राहिला.
मिडकॅप, स्मॉलकॅपही घसरणीत
शेअरबाजारात हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा कन्झुमर, नेस्ले, ब्रिटानिया, एचडीएफसी लाइफ यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते तर टाटा मोटर्स, ओएनजीसी, अदानी पोर्टस्, टाटा स्टील, हिंडाल्को यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत पाहायला मिळाले. याचदरम्यान बीएसई मिडकॅप निर्देशांक 1718 अंकांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 2297 अंकांनी घसरलेला दिसला.
इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाची शक्यता असून त्याचा परिणाम जागतिक बाजारांवर दिसला. याने भारतीय बाजारावरही परिणाम दिसला. तसेच अमेरिकेतही मंदीची शक्यता सांगितली जात असून अमेरिकेतील बाजारात घसरण दिसली. जपानने अलीकडेच व्याजदर 0.1 टक्के वाढवत 0.25 टक्के केले असून 15 वर्षातील हे उच्चांकी दर आहेत. याचाही परिणाम जागतिक बाजारावर राहिला. 5 ऑगस्ट रोजी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 441 लाख कोटी रुपयांवर आले होते, जे शुक्रवारी 457 लाख कोटी रुपये होते.
जागतिक बाजारात घसरण
बाजारात मोठ्या घसरणीबाबतचा इतिहास पाहता वर्षातील ही दुसरी घसरण होय. याआधी लोकसभा निवडणूक निकालादिवशी 4 जूनला सेन्सेक्स 4389 अंकांनी घसरत 72,079 अंकांवर खाली आला होता. जागतिक बाजारात पाहता जपानचा निक्केई 12 टक्के घसरणीत होता तर कोरीयाचा कोस्पी 8 टक्के इतका जबर घसरलेला होता. हाँगकाँगचा हँगसेंग 1.46 टक्के घसरणीत होता. चिनचा शांघाई कम्पोझीट 1.54 टक्के घसरणीसोबत बंद झाला.