दमदार मजबुतीसोबत शेअरबाजार बंद
सेन्सेक्स 573 अंकांनी वधारला, बँक, ऑटो समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
आशियाई बाजारातील तेजी आणि ऑटो व बँकेच्या समभागांच्या दमदार कामगिरीचा परिणाम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळाला. सेन्सेक्स 573 अंकांनी तर निफ्टी 182 अंकांनी वाढत बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक त्याचप्रमाणे मिडकॅप निर्देशांक नव्या शिखरावर बंद झाला.
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 573 अंकांनी तेजीसमवेत 85762 अंकांवर बंद झाला. यासोबत राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 182 अंकांनी वाढत 26328 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकही नव्या उच्चांकावरही बंद झाला. 439 अंकांच्या वाढीसोबत बँक निफ्टी निर्देशांक 60150 अंकांवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्स 70 अंकांच्या वाढीसोबत 85259 च्या स्तरावर खुला झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक वाढीसोबत 26155 वर खुला झाला. इंट्रा डे दरम्यान निफ्टीने 26340 अंकांची सर्वकालिक उच्चांकी गाठली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून सातत्याने होत असणारी खरेदी बाजाराला मजबूत करण्यात हातभार लावत होती. कंपन्यांकडून चांगल्या उत्पन्नाचे संकेत, मजबूत वाहन विक्री त्याचप्रमाणे बँकांची सकारात्मक कामगिरी या सर्वांचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर सकारात्मक पाहायला मिळाला.
समभागांची कामगिरी
कोल इंडिया, एनटीपीसी, हिंडाल्को, ट्रेंट, ओएनजीसी, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एसबीआय लाईफ, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, सिप्ला, टाटा स्टील, सनफार्मा, अपोलो हॉस्पिटल, इटर्नल, टायटन, ग्रासिम, विप्रो आणि टाटा मोटर्स पीव्ही यांचे समभाग तेजीत होते. आयडीबीआय बँक, एनएलसी इंडिया, टोरंट पॉवर, इरेडा हे मिडकॅप निर्देशांकातील समभागसुद्धा तेजीत होते. दुसरीकडे घसरणीमध्ये आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक यांचा समावेश होता.