शेअरबाजार दमदार तेजीसोबत बंद
सेन्सेक्स 487 अंकांनी तेजीत, ऑईल अँड गॅस निर्देशांक वधारला
मुंबई :
मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांच्या दमदार कामगिरीसोबत ऑईल अँड गॅस निर्देशाकाने केलेल्या कामगिरीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर बुधवारी पहायला मिळाला. सेन्सेक्स 487 अंकांनी तर निफ्टी 167 अंकांनी वाढत बंद झाला. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 487 अंकांनी वाढत 82344अंकांवर बंद झाला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 167 अंकांनी तेजीसमवेत 25342 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 393 अंकांनी वाढत 59598 अंकांवर बंद झाला. विविध निर्देशांकात ऑईल आणि गॅस क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक 3.4 टक्के वाढीसोबत बंद झाला. फायन्साशियल सर्व्हिसेस, आयटी, ऑटो, मिडीया, मेटल, सरकारी बँक, प्रायव्हेट बँक आणि रियल्टी निर्देशांक जवळपास अडीच टक्के इतकी तेजी राखत बंद झाले आहे. सेन्सेक्समध्ये पाहता 30 पैकी 22 समभाग तेजीसमवेत तर निफ्टीतील 50 पैकी 33 समभाग तेजी दाखवत बंद झाले.
निर्देशांकांची कामगिरी
निफ्टीत एफएमसीजी आणि फार्मा हे दोन निर्देशांक घसरणीत राहिले होते. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, इन्फ्रा यांचे निर्देशांक मात्र तेजीसमवेत कार्यरत होते.
समभागांची कामगिरी
समभागांमध्ये बीईएल, इर्टनल, ओएनजीसी, कोल इंडिया, हिंडाल्को, बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकांत ऑईल इंडिया, सिजी पॉवर, सोलार इंडस्ट्रीज, माझगाव डॉक शिप, भारत डायनॅमिक्स आणि कोचिन शिपयार्ड यांचे समभाग तेजी राखण्यात आघाडीवर होते.
घसरणीतील समभाग
घसरणीमध्ये पाहता टाटा कंझ्युमर्स, एशियन पेंटस्, मारुती सुझुकी, मॅक्स हेल्थ केअर, सनफार्मा, डॉ. रे•ाrज लॅब्ज यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. तर मिडकॅप निर्देशांकातील भारती हेक्साकॉम, हिंदुस्थान झिंक, टाटा कम्युनिकेशन, मॅरीको व अपोलो टायर यांची कामगिरी निराशादायी झाली होती. आशियाई बाजारामध्ये कोरियाचा कोस्पी 1.69 टक्के तर जपानचा निक्केई 0.047 टक्के वाढत बंद झाला.